Monday, June 5, 2023

मोबाईलमुळे जग जवळ येतंय पण लेकरं मात्र आई-बापापासून दुरावत आहेत. - इंद्रजीत देशमुख

 मोबाईलमुळे जग जवळ येतंय पण लेकरं मात्र आई-बापापासून दुरावत आहेत. - इंद्रजीत देशमुख          


कराड/प्रतिनिधी: 
        स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक थोर विभूतींनी मोठं मोठी स्वप्न पाहिली. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविले, पण अलीकडच्या ७५ वर्षात आमची स्वप्न मात्र खुजी झाली. आत्मकेंद्री राहिली. मी आणि माझे कुटुंब बस एवढेच! त्यात संस्कारांचे पतन आणि समाजभान देखील आम्ही हरपत चाललो आहोत. तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आलं पण लेकरू मात्र आई-बापापासून खूप दूर चाललं आहे. भावनाशून्य शिक्षण हे शिक्षणाचे ध्येय कधीच नव्हते पण आमचा तरुण या भावभावनांपासून देखील दूर चालला आहे. कुटुंबव्यवस्था देखील हा मोबाईल मोडकळीस आणतो की काय, अशी भीती आता ज्येष्ठांना सतावू लागली आहे. तेव्हा पोरांनो माघारी फिरा असे भावनिक आवाहन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी केले.
        शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे होते. तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते.
            इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले, सुरुवातीच्या काळातले शिक्षण हे जीवनशिक्षण होते. ६४ कला शिकविणारे होते. खरंतर आईच्या शब्दातूनच मूल्य संस्काराला सुरुवात होत होती. पण आम्ही मात्र आता पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षणाचे  अवमूल्यन केले. इतरांबद्दल प्रेम आणि इतरांच्या दुःखाने डोळ्यात पाणी येणं आता संपत चाललं आहे. फक्त माहिती म्हणजे शिक्षण नव्हे तर शहाणपण, चेतनेचा विकास हेच खरं शिक्षण आहे. तरुणांचे भावनिक विश्व कस सुदृढ करता येईल यावर तज्ञांना देखील आता काम करावं लागत आहे. हे मोठं दुर्दैव आहे.                भारतातील तरुणांचे मोबाईल रोज सरासरी १३ ते १४ तास चालू असतात. सरासरी झोप तीन तासांवर येऊन थांबली आहे. जंगली रमी रोज २० ते २५ आत्महत्या घडवून आणत आहे. सेल्फी दररोज ३० ते ३५ आत्महत्या करायला लावत आहे. नेटफ्लिक्सला तरुणांची झोप संपवायची आहे. तरुणांच्या डोक्यात हिंसा घालायची आहे. व्हाट्सअॅप, फेसबुक विद्यापीठाने तर आमची पोरं संपवली आहेत. दुसऱ्या बाजूला पालकांनी देखील घरात येणारा पैसा पारदर्शक आणायला हवा तरच तेथे मूल्यांची उंची वाढलेली असेल. तेव्हा समाजभान असणाऱ्या व्यक्ती आपण घडवूया. तरच जग वाचेल असेही ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे म्हणाले, सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा ही पंचसूत्री सर्वांनी आचरणात आणली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाचे मूल्य हे संस्कारावर ठरत असते. संस्कारपूर्ण आणि समाजाबद्दल आपलेपणाची भावना असणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने समाजाला विधायक दिशा देऊ शकते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणातून संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबविला पाहिजे. विद्यार्थ्यांना समाजशील बनवणे ही खरी शिक्षकांची कसोटी असून त्याबाबत शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे.
        महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, अशा विधायक उपक्रमातून आम्हाला बापूजींचे संस्मरण अधिक प्रकर्षाने होते व त्यातून कार्यप्रवण होण्यासाठी अधिकची ऊर्जा मिळते. बापूजींचे विचार जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू आणि बापूजींच्या विचारांजवळ जाण्याचे आत्मिक समाधान मिळवू असेही ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शोभा लोहार यांनी तर आभार प्रा.सुरेश रजपूत यांनी मानले. व्याख्यानास शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. व्याख्यानमालेस संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन प्राचार्य एन.जी.गायकवाड, प्राचार्य एस.के.कुंभार, प्राचार्य आर.के.भोसले तसेच सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील, माजी प्राचार्य डॉ.सुभाष शेळके तसेच संस्थेतील आजी-माजी पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने हजर राहून कार्यक्रम यशस्वी केला.



साळुंखे महाविद्यालयात सोमवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे आयोजन

 साळुंखे महाविद्यालयात सोमवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे आयोजन 


कराड/प्रतिनिधी: शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमाले अंतर्गत "शिक्षणातून मूल्यसंस्कार आणि समाजभान" या विषयावर शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक श्री. इंद्रजीत देशमुख यांचे जाहीर व्याख्यान सोमवार, दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे होणार असल्याची माहिती प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.                       
शिक्षण ही मूलभूत गरज आहेच. परंतु आज एका बाजूला विकासाच्या संकल्पनेमागे धावताना  विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव समाजमनावर आहे. तर  दुसऱ्या बाजूला सुशिक्षित समाज, समाजभान हरपत चालला आहे. संस्कारमूल्य विसरत चालला आहे. यातून तयार होणारा संवेदनशून्य समाज संस्कृतीला बाधा आणणारा आहे. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा कुठेतरी मूल्यसंस्कारावर गांभीर्याने चर्चा करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मूल्यसंस्कार व समाजभान जनसामान्यांच्या मनात बीजारोपीत  करण्यासाठी तसेच शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे कार्य व  तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानेच ही  व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित केली आहे.                    

सदर व्याख्यानमालेचे अध्यक्षपद श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सदर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, आजी माजी संस्था पदाधिकारी तसेच कराड नगरीतील सर्व नागरिकांना या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवकवर्ग परिश्रम घेत आहेत. 

फोटो कॅप्शन: प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड




सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी आपले आरोग्य जपावे- प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप

 सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी आपले आरोग्य जपावे- प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप              


कराड/प्रतिनिधी : 
    खरंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिला सक्षमपणे सांभाळत असतात. त्यामुळेच अलीकडे महिलांमध्ये अतिताणामुळे आरोग्याच्या दृष्टीने अधिक तक्रारी येऊ लागल्या आहेत. विशेषत: महिलांमध्ये हिमोग्लोबिन पातळी कमी दिसून येत आहे. त्यामुळे सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्याशिवाय महिलांनी नाती देखील सक्षमपणे सांभाळली पाहिजेत तरच कुटुंबव्यवस्था टिकून राहील. समाजात वृद्धाश्रम राहणार नाहीत असे प्रतिपादन सगाम महाविद्यालय, कराडच्या  प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप यांनी केले.            महिला दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्या अनिता पोतदार, प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील, प्रा.अशोक खोत आदी होते.                 
        प्रा.डॉ.कोमल कुंदप पुढे म्हणाल्या, स्त्री आयुष्यात जेव्हा यश मिळवून दाखवते तेव्हा तिचा सर्वप्रथम सन्मान करणारे तिचे वडील असतात. त्यानंतर भाऊ व पती असतो. आज समाजात महिला दिन साजरा करावा लागतोय हेच खरं दुर्दैव आहे. महिलांना रोज कुटुंबात योग्य तो आदर मिळणे ही जबाबदारी खरंतर  पुरुषांची आहे. पुरुषांनी देखील याचे योग्य ते भान ठेवायला हवे. 
        कमला नेहरू अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या अनिता पोतदार म्हणाल्या, निसर्गाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक सहनशीलता दिली आहे. सक्षमता दिली आहे. परंतु समाजात तिला नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. याकरीता स्त्रियांबद्दल असणारी समाजाची नकारात्मक मानसिकता बदलली गेली पाहिजे.                         
        प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, संपूर्ण जगभरातील महिलांबद्दल आदर,अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. खरंतर महिलांचे हक्क त्याचबरोबर त्यांचे शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
        याप्रसंगी महिला दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्राध्यापिका यांचा यथोचित गौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. सौ उज्वला पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.सचिन बोलाईकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.कु.दिपाली वाघमारे यांनी केले तर आभार प्रा.सोनाली रांगोळी यांनी मानले. महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. 

फोटो कॅप्शन: बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.कोमल कुंदप सोबत प्राचार्या अनिता पोतदार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड आदी मान्यवर.



जगाचा पोशिंदा शेतकरी आजही भूकेने व्याकुळ आहे- प्रा.डॉ.ए.के.पाटील

जगाचा पोशिंदा शेतकरी आजही भूकेने व्याकुळ आहे- प्रा.डॉ.ए.के.पाटील                


कराड/प्रतिनिधी: 
            स्वातंत्र्यप्राप्तीवेळी कृषी आणि संलग्न क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा ५० टक्के पेक्षा अधिक होता. त्यानंतर मात्र तो सातत्याने घसरत जाऊन २० टक्के पर्यंत खाली आला. प्रगतशील राष्ट्रांच्या तुलनेत आजही भारतातील राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा हा अधिकच आहे परंतु असे असले तरी १४० कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरविणारा जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र अजूनही भुकेने व्याकुळ आहे. त्याची आर्त  किंकाळी अजूनही व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. हेच या कृषीप्रधान देशाचे दुर्दैव आहे असे भावनिक प्रतिपादन सगाम कॉलेजचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.ए.के. पाटील यांनी केले. 
        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि सगाम महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने लीड कॉलेज अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख साधनव्यक्ती म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा.डॉ.राजाराम कांबळे, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा.सुरेश रजपूत, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.डॉ.मारुती सूर्यवंशी आदी प्रमुख उपस्थित होते. 
        प्रा.डॉ. ए.के.पाटील पुढे म्हणाले, अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच वेळा नैसर्गिक संकटांमुळे शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्था अडचणीत येते. तसेच काही वेळेस अतिरिक्त उत्पादनामुळे देखील शेतकरी व अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल पडसाद उमटतात. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थेने कार्यतत्पर असले पाहिजे असे आग्रही मत त्यांनी यावेळी मांडले. 
        नागठाणे कॉलेजचे प्रा.डॉ.राजाराम कांबळे म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपल्या देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली संस्थानिकांचे विलीनीकरण, कल्याणकारी राज्याची संकल्पना, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, हरितक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाचे धोरण, औद्योगीकरण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास असे अनेक प्रकारचे बदल आपण आज पाहतो आहोत. तरीसुद्धा आज मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, बेकारी आपल्या देशात दिसून येत आहे. देशातील मुठभर लोकांच्याकडे जवळपास ८० टक्के संपत्ती आहे. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. 
        अध्यक्षस्थानावरून प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, अर्थतज्ञ हे संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेचे दीपस्तंभ आहेत. आजारी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ते अहोरात्र काम करत असतात. पण त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने देशाला उपयोजित अर्थतज्ञांची गरज आहे. 
        कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.सचिन बोलाईकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.मारुती सूर्यवंशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.जयदीप चव्हाण यांनी तर आभार प्रा.रवीकुमार अवसरे यांनी मानले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक यांनी कार्यशाळेस उपस्थिती दर्शवून कार्यशाळा संपन्न केली.    

फोटो कॅप्शन: 'स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि भारतीय अर्थव्यवस्था' या एकदिवसीय कार्यशाळेत बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.ए.के.पाटील सोबत प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड, प्रा.डॉ.राजाराम कांबळे





मराठी भाषेवर मनापासून प्रेम करा, भाषेचा सन्मान करा- प्रा.सुभाष कांबळे

मराठी भाषेवर मनापासून प्रेम करा, भाषेचा सन्मान करा- प्रा.सुभाष कांबळे          


कराड/प्रतिनिधी: 
    वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्याप्रती सद् भावना  म्हणून तसेच मराठी भाषेप्रती प्रेम वृद्धिंगत व्हावे, भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषिकांनी मराठी भाषेवर मनापासून प्रेम करावे हीच या दिवशी मनोकामना बाळगून मराठीचा सन्मान करू असे प्रतिपादन प्रा.सुभाष कांबळे यांनी केले. 

    मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनाच्या औपचारिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.सौ. उज्वला पाटील, प्रा.अशोक खोत, नवोदित साहित्यिक सुरज साठे आदी होते. 

    प्रा.सुभाष कांबळे पुढे म्हणाले, भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पंधरावी तर भारतातील तिसरी भाषा आहे. आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा देखील येणे गरजेचे असले तरी मराठी भाषेचे महत्त्वदेखील टिकवून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. 

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, मराठी भाषेबद्दल आदराची भावना प्रेम दाखवण्यासाठी हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक जनमानसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगाला येणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करता येईल. एकंदरीतच तुमची आमची सर्वांचीच मराठी ही आपलेपणाची भाषा आहे. 

यावेळी महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी नवोदित साहित्यिक सुरज साठे याचा 'मुक्ता साळवे पुरस्कार' मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.महेश गायकवाड, प्रा.डॉ.सौ. उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे यश मिळू शकलो अशा भावना सुरज साठे याने या वेळी व्यक्त केल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. सौ.उज्वला पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.दयानंद कराळे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                
फोटो कॅप्शन: मुक्ता साळवे साहित्य पुरस्कार प्राप्त महाविद्यालयाचा नवोदित साहित्यिक सुरज साठे याचा सत्कार करताना प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड सोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.सुभाष कांबळे, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ.उज्वला पाटील, प्रा. अशोक खोत आदी मान्यवर.



साळुंखे महाविद्यालयाच्या प्रा.कु.शोभा लोहार यांचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

 साळुंखे महाविद्यालयाच्या प्रा.कु.शोभा लोहार यांचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश 


कराड/प्रतिनिधी: 
    श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, कोल्हापूर अंतर्गत गुरुदेव कार्यकर्ता गटामधून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील  प्रा.कु.शोभा नावजी लोहार यांनी द्वितीय क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच संस्थेतील प्राध्यापकांना देखील अध्यापनाबरोबरच लेखन, वक्तृत्व, चित्रकला, गायन या विविध कलाक्षेत्रात सजग ठेवण्याच्या      दृष्टिकोनातून, परिपूर्ण शिक्षक निर्मितीसाठी या स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. सदर शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा नुकत्याच लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातील १३ जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. प्रा.कु.शोभा लोहार यांनी 'महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे योगदान' या विषयाची कौशल्य पूर्ण मांडणी करत उपस्थितांची मने जिंकत द्वितीय क्रमांक पटकावला. 

सदर स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ. देवानंद सोनटक्के व प्रा.डॉ.केशव मोरे यांनी केले. तर बक्षीस वितरण समारंभ विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार, संस्था सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, स्पर्धा समन्वयक प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अशोक तवर, प्राचार्या सौ.कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रा. कु.शोभा लोहार यांच्या यशाबद्दल कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, सचिवा प्राचार्य शुभांगीताई गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, तसेच प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा.सुरेश रजपूत तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

फोटो कॅप्शन: विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना प्रा.कु.शोभा लोहार सोबत सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड आदी. मान्यवर




भविष्यातील यशाचा पाया महाविद्यालयीन जीवनात एनसीसी मुळेच घातला जातो- ब्रिगेडीयर अभिजीत वाळिंबे

भविष्यातील यशाचा पाया महाविद्यालयीन जीवनात एनसीसी मुळेच घातला जातो- ब्रिगेडीयर अभिजीत वाळिंबे


कराड/प्रतिनिधी: 
    आपल्या जीवनात उत्तम आणि सर्वोत्तम करण्याची भावना जागृत कराल तरच जीवन सफल होईल. सफल आयुष्याचा पाया घालण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात एनसीसी करत असते. म्हणून जेव्हा सफलता मिळेल तेव्हा तुम्ही त्याचे सर्व श्रेय महाविद्यालयातील एनसीसी मध्ये व्यतित केलेल्या त्या तीन वर्षांना नक्किच द्याल.
लहान लहान गोष्टींमधून शिकण्याचा प्रयत्न करा. याच लहान लहान गोष्टी तुम्हाला यशस्वी जीवन जगण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करतील  असे प्रतिपादन ब्रिगेडियर अभिजीत वाळंबे यांनी एनसीसी १९ महाराष्ट्र बटालियन कॅडेट भेटी दरम्यान केले.
    ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे पुढे म्हणाले, मी सातत्याने १९ महाराष्ट्र बटालियनच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व एनसीसी कॅडेटना कायम भेटून मार्गदर्शन करणार आहे. 
    अध्यक्षीय मनोगतात एसजीएम महाविद्यालय, कराडचे उपप्राचार्य एस.ए.पाटील म्हणाले, एनसीसी हे महाविद्यालयाचे अतिशय महत्त्वाचे अंग आहे. त्यात सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून शक्य तितके सहकार्य केले जाते व नेहमीच केले जाईल. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर आपल्या महाविद्यालयाचे आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे तसेच देशाचे नाव मोठे करावे.
        १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे ग्रुप कमांडर, कोल्हापूर ग्रुप यांनी कराड तालुक्यातील १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड अंतर्गत महाविद्यालयातील एनसीसी युनिटना सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, वेणूताई चव्हाण कॉलेज कराड, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड, दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेज कराड, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड आणि कृष्णा महाविद्यालय, रेठरे आदी महाविद्यालयांचा समावेश होता. 
    कर्नल जे.पी.सत्तिगिरी, कमांडिंग ऑफिसर, दिनेशकुमार झा अॅडम ऑफिसर, १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लेफ्टनंट संदीप महाजन ए एन ओ, १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार लेफ्टनंट डॉ. महेंद्र कदम पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कोमल कुंदप यांनी केले.



साळुंखे महाविद्यालयाचा महेश निकम बीजे परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम

 साळुंखे महाविद्यालयाचा महेश निकम बीजे परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम 


कराड/प्रतिनिधी: 
    शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड चा विद्यार्थी महेश बाळासो निकम याने पत्रकारिता पदवी (बी.जे) या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पत्रकारिता पदवी (बी.जे) हा अभ्यासक्रम बापूजी साळुंखे महाविद्यालयात सुरू आहे. बी.जे अभ्यासक्रमाच्या बाबतीत महाविद्यालयात उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी महाविद्यालयातील विद्यार्थी महेश निकम याने शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकामध्ये भर घातली आहे. 
त्याच्या या यशाबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्य शुभांगीताई गावडे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड प्रा.अशोक खोत, प्रा.सुरेश रजपूत सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले. या अभ्यासक्रमासाठी त्याला बीजे विभागाच्या विभागप्रमुख प्रा.स्नेहलता शेवाळे-पाटील, प्रा.संभाजी पाटील, प्रा.स्नेहल वरेकर, प्रा.जीवन अंबुडारे,  देवदास मुळे, सुशील लाड यांचे मार्गदर्शन त्यास लाभले.



स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सॉफ्ट स्किल आत्मसात करणे गरजेचे - प्राचार्य डॉ.सतीश घाटगे

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सॉफ्ट स्किल आत्मसात करणे गरजेचे- प्राचार्य डॉ.सतीश घाटगे


कराड/प्रतिनिधी: 
    स्पर्धा परीक्षांकडे सर्वात कठीण परंतु प्रतिष्ठेच्या परीक्षा म्हणून पाहिले जाते. कोणाला या परीक्षांमध्ये आयुष्याचा अर्थ दिसतो, कोणाला सत्तेचा राजमार्ग तर काहींना जनसेवेची संधी दिसते. उमेदवारांचा दृष्टिकोन काहीही असला तरी या परीक्षांचे आकर्षण मात्र कायम आहे. खरंतर या नोकरी देण्याच्या परीक्षा नसून सक्षमपणे देश चालवण्यासाठी प्रगल्भ उमेदवार निवडीच्या परीक्षा आहेत असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरजचे प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांनी केले.                    

बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग आणि सगाम महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने लीड कॉलेज अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख साधनव्यक्ती म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा.डॉ.दीपक नगरकर, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा.सुरेश रजपूत, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.रत्नाकर कोळी आदी. प्रमुख उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ.सतीश घाटगे पुढे म्हणाले, या परीक्षांमध्ये पद, पैसा, सामाजिक प्रतिष्ठा असे सर्व काही आहे मात्र यासाठी उमेदवारांकडे सर्वसमावेशक अभ्यासाबरोबरच हार्ड स्किल आणि  सॉफ्ट स्किल असणं खूप गरजेच आहे. स्वच्छ पारदर्शी कामकाज, प्रामाणिकपणा, कौशल्यपूर्णता, अधिक क्षमता, समानूभूती, स्वजाणीव, नवनिर्मिती विचार प्रक्रिया, उत्तम संभाषण कौशल्य, वैचारिक टीकात्मता, निर्णयक्षमता, समस्यासमाधान आदी सारखी १५० पेक्षा अधिक सॉफ्ट स्किल असलेला उमेदवार देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. त्यामुळे आजकाल सॉफ्ट स्किल आत्मसात करणे खूप महत्त्वाचं ठरत आहे. 

वेणूताई चव्हाण कॉलेज चे प्रा.डॉ.दीपक नगरकर म्हणाले, स्पर्धा परीक्षांमध्ये मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी बायोडाटा, रिझ्युम, क्युरीक्युलम व्ह्यायटे यातील महत्त्वाचा फरक समजावून घेतला पाहिजे. आपल्या सीव्ही मध्ये जाणीवपूर्वक आपली बलस्थाने अधोरेखित केली पाहिजेत जेणेकरून मुलाखतकार त्याच अनुषंगाने प्रश्न विचारू शकेल आणि उमेदवार आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरा जाऊ शकेल. मुलाखतीमध्ये विशेषतः तुमचा आत्मविश्वास, नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन, देहबोली एकूणच तुमचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे समोर येणे गरजेचे असते.                      

अध्यक्षीय स्थानावरून प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम असले पाहिजे. त्यासाठी सॉफ्ट स्किल बरोबरच हार्ड स्किल विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. 

कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.कु. माधुरी वेताळ, प्रा.अभिजीत दळवी यांनी करुन दिला. कार्यशाळेची संकल्पना प्रा.रत्नाकर कोळी यांनी मांडली. सूत्रसंचालन प्रा.कु.स्नेहल वरेकर यांनी तर आभार प्रा.तबस्सुम आत्तार यांनी मानले. सदर कार्यशाळेस तळमावले तसेच उंडाळे कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक विशेष उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक यांनी कार्यशाळेत उपस्थिती दर्शवून कार्यशाळा संपन्न केली. 

फोटो कॅप्शन: बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सतीश घाटगे.



प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड दुसऱ्यांदा पीएच.डी पदवीने सन्मानित

प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड दुसऱ्यांदा पीएच.डी पदवीने सन्मानित 


कराड/प्रतिनिधी: 
        श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराडचे  प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश नारायण गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाने नुकतीच मराठी विषयातील पीएच.डी पदवी प्रदान केली. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी "नवभारत मधील वैचारिक वाड्मय" या विषयावर मूलभूत संशोधन करून सदरचा प्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर केला होता. त्यास मान्यता देऊन विद्यापीठाने त्यांना पीएच.डी पदवीने सन्मानित केले. रयत शिक्षणसंस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. 
           डॉ. महेश गायकवाड हे श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आहेत. त्यांचे विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल मधून २२ पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी २ पुस्तकांचे लेखन केले असून ४ ग्रंथाचे संपादन केले आहे.
           या पूर्वी त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात "माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलते"वर संशोधन केले असून ह्या संशोधनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे.
         एनसीसी चे कॅप्टन म्हणून देखील गेली वीस वर्षे यशस्वी कार्य केले असून याकाळात त्यांचे २०० पेक्षा अधिक विद्यार्थी सैन्यदलात भरती झाले आहेत. तसेच विविध क्षेत्रात ५ विद्यार्थी अधिकारी पदावर गेले आहेत. याबद्दल त्यांना एनसीसी मधील राष्ट्रीय स्तरावरील डायरेक्टर जनरल कमेंडेशन कार्ड पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच यापूर्वी त्यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. डॉ. महेश गायकवाड हे महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा साताराचे कार्याध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
             मराठी विषयातील पीएच.डी संपादन केल्याबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगीताई गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, सहसचिव अर्थ प्राचार्य सिताराम गवळी, संस्था सीईओ कौस्तुभ गावडे कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांच्यासह शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा मधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील सर्वच स्तरातून प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे. 

फोटो कॅप्शन: प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड



भविष्यातील पिढीला स्वच्छ जलसाठे देण्यासाठी प्रयत्नशील राहू - प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

भविष्यातील पिढीला स्वच्छ जलसाठे देण्यासाठी प्रयत्नशील राहू - 

                                                                प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड   

( पुनीत सागर अभियानाअंतर्गत साळुंखे महाविद्यालयाकडून कृष्णा नदीकाठालगतची स्वच्छता)                
कराड/प्रतिनिधी: 
        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एनसीसी छात्रसैनिकांमार्फत पुनीत सागर अभियानास देशभरात डिसेंबर २०२१ पासून सुरुवात केली गेली. जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवणे तसेच स्थानिक लोकांना जलीय प्रदूषणासंदर्भात जागरूक करणे असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाला देशभरातून व्यापक लोकप्रियता प्राप्त होत असून हे अभियान एनसीसी छात्रसैनिकांपुरते मर्यादित न राहता जनसामान्यांनी या अभियानात समर्पित भावनेने उतरले पाहिजे तरच भविष्यातील पिढीला आपण स्वच्छ जलस्त्रोत देऊ शकू असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. 

        पुनीत सागर अभियानांतर्गत बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या एनसीसी छात्र सैनिकांमार्फत तसेच एनएसएस स्वयंसेवकांमार्फत प्रीतीसंगमावरील कृष्णा नदी तीरावरील स्वच्छता केली. यावेळी १०० किलो पेक्षा अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला गेला. त्यात रिकाम्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल, काच सामान, नदीत सोडलेले वेगवेगळ्या प्रकारचे निर्माल्य, विशेषतः पर्यावरणास घातक कचरा याचे निर्मूलन यामध्ये केले गेले. या स्वच्छतेसोबतच छात्र सैनिकांनी व स्वयंसेवकांनी स्थानिक लोकांना तसेच तेथे आलेल्या पर्यटकांना प्रदूषणा संदर्भात जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला. या अभियानांतर्गत भविष्यात चित्रकला, पोस्टर, निबंधस्पर्धा, कविता, वादविवाद, पथनाट्य आदींचे आयोजन करून अधिकाधिक प्रदूषणासंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड यांनी दिली. भविष्यातील पिढीला स्वच्छ जलसाठे सुपूर्द करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. 

        १९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर जे.पी.सत्तीगिरी,  अॅडम ऑफिसर दिनेश कुमार झा यांच्या आदेशानुसार हे काम आम्ही एनसीसी छात्रसैनिकांकडून करून घेतले असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी एनसीसी छात्रसैनिकांसोबतच एनएसएस स्वयंसेवक त्याचबरोबर सुभेदार मेजर पी.बी.थापा, सुभेदार नानासाहेब यादव, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा.स्नेहल वरेकर, प्रा.डॉ.अवधूत टिपूगडे, प्रा.सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा.अभिजीत दळवी, प्रा.डॉ.शितल गायकवाड, प्रा.दिपाली वाघमारे  तसेच महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन: पुनीत सागर अभियानांतर्गत कृष्णा नदी काठाची स्वच्छता करताना एनसीसी छात्रसैनिक व एनएसएस स्वयंसेवक सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड.



बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश

 बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश       


कराड/ प्रतिनिधी: 
    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर अंतर्गत श्री. स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त सातारा जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन सुशिलादेवी विद्यामंदिर, सातारा येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. 

सातारा जिल्हास्तरीय महाविद्यालयीन गटातील वक्तृत्व स्पर्धेमध्ये शेख सोहेल (बी.ए भाग- २) या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. त्याची १७ फेब्रुवारी रोजी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे होणाऱ्या संस्थांतर्गत राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा गुरुदेव कार्यकर्ता गटात प्रा. शोभा लोहार यांनी प्रथम क्रमांक तर प्रा. गोरख गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. 

याशिवाय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रा. सुरेश यादव यांनी प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापक यांची १७ फेब्रुवारी रोजी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी अभिनंदन करत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

फोटो कॅप्शन: सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करताना प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड सोबत प्रा.सुनिल शिंदे.



जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरते - प्रा. प्रतिभा पैलवान

 जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरते - प्रा. प्रतिभा पैलवान                                          


कराड/प्रतिनिधी: 
    बऱ्याचदा जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरत असते. क्षणोक्षणी नवनवे सुचवत जाते. भावनांची  उत्स्फूर्तता शब्द जुळवत जातात आणि सुरेख अशी काव्यनिर्मिती होते. अनेकदा ही काव्यनिर्मिती इतरांना प्रेरक, मार्गदर्शक ठरत असते. त्या त्या परिस्थितीतील भावनांची गोड कुपी म्हणून सुद्धा लिखित काव्याकडे पाहता येईल. विद्यार्थ्यांनी देखील या काव्य निर्मितीचा आनंद लुटावा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री आणि कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या प्रा.प्रतिभा पैलवान यांनी केले. 

बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभाग व प्रीतीसंगम हास्य परिवार आयोजित कवी संमेलनात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.सौ.उज्वला पाटील, आनंद कलबुर्गी, प्रा.अशोक खोत, प्रा.सुरेश रजपुत आदी होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, कविता हा अतिशय अर्थगर्भ प्रवाह आहे. त्यातील शब्दसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य टिपता आले पाहिजे. कविता म्हणजे भावनांचे सादरीकरण असते. वेदना साजरा करणाराच कवी होतो. त्यामुळे वेळीच भावना शब्दबद्ध केल्या तर अप्रतिम काव्य निर्मिती होऊ शकेल असे ते म्हणाले. 

प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील म्हणाल्या, कवी संमेलन हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा महत्त्वाचा उपक्रम असून त्याद्वारे नव्या पिढीकडून मराठी भाषा आपोआपच संवर्धित होईल. 

यावेळी आनंद कलबुर्गी, प्रसाद भस्मे, सचिन कांबळे, श्रुती कांबळे, रोहित कांबळे, प्रा.सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा.अण्णा पाटील, प्रा.अभिजीत दळवी, प्रा.दयानंद कराळे, प्रा.शोभा लोहार, प्रा.स्नेहल वरेकर, प्रा. स्वप्नाली काळे यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.शीतल गायकवाड तर आभार प्रा.शोभा लोहार यांनी मानले. फोटो 

कॅप्शन: 'मराठी भाषा पंधरवडा' दिनानिमित्त कवी संमेलनात मार्गदर्शन करताना प्रा. प्रतिभा पैलवान सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील, आनंद कलबुर्गी आदी मान्यवर..



 'युवक' हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे

 -  व्हाईस अडमिरल मुरलीधर पवार

सातारा/प्रतिनिधी: 
        युवक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे, आपल्या देशाचा जवान आहे. देशाप्रती त्याने नेहमी कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी देशातील महापुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे,  स्वामी विवेकानंद, लाल बहादूर शास्त्री, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या अनेक समाजसुधारकांचे आपण  वारसदार आहोत, त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणे हे आजच्या युवकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मविश्वासाने वावरले पाहिजे. कोणत्याही अपयशाने खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपले स्वतःचे ध्येय  ठरविले पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळेल. जी आपले आयुष्य समृद्ध करेल." असे उदगार भारतीय नौदलातील माजी उपनौसेना अध्यक्ष मा. व्हाईस अडमिरल मुरलीधर सदाशिव पवार  यांनी काढले.                       
        लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, सातारा येथे लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृती निमित्त आयोजित 'जय जवान जय किसान' व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.महाविद्यालयामध्ये  लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त ११ जानेवारी रोजी  दरवर्षी दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली जाते. ११ जाने. रोजी जय जवान साठी एक जवान आणि १२तारखेला जय किसान साठी एक शेतकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. हे वर्ष या व्याख्यानमालेचे १८ वे वर्ष आहे.
 
        कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ म्हणाले की, "भारतीय नौदलातील माजी उपनौसेना अध्यक्ष मा. व्हाईस अडमिरल मुरलीधर सदाशिव पवार हे एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत.  सातारा येथील चितळी सारख्या ग्रामीण भागात जन्मलेले मुरलीधर पवार देशातील एका उच्च पदावर काम करू शकतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांनी देशासाठी केलेले कार्य,वेगवेगळ्या पदांवरून केलेले आपले कार्य हे आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठी ही महत्वाचे आहे. तरुणांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन देशसेवा केली पाहिजे.तसेच त्यांनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदलाचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांनी देशसेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले." त्याचबरोबर आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे व्हाइस अॅडमिरल मुरलीधर पवार यांच्या नौसेना दलातील कार्याचा गौरव केला.   

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील एनसीसी  विभागाचे प्रमुख मा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. त्यांनी "जय जवान जय किसान" व्याख्यानमाले मागची  भूमिका  विशद केली. 

        


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजया पवार यांनी केले तर आभार डॉ. दीपक जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.