Monday, June 5, 2023

 'युवक' हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे

 -  व्हाईस अडमिरल मुरलीधर पवार

सातारा/प्रतिनिधी: 
        युवक हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे, आपल्या देशाचा जवान आहे. देशाप्रती त्याने नेहमी कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी देशातील महापुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे,  स्वामी विवेकानंद, लाल बहादूर शास्त्री, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या अनेक समाजसुधारकांचे आपण  वारसदार आहोत, त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणे हे आजच्या युवकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मविश्वासाने वावरले पाहिजे. कोणत्याही अपयशाने खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपले स्वतःचे ध्येय  ठरविले पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळेल. जी आपले आयुष्य समृद्ध करेल." असे उदगार भारतीय नौदलातील माजी उपनौसेना अध्यक्ष मा. व्हाईस अडमिरल मुरलीधर सदाशिव पवार  यांनी काढले.                       
        लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, सातारा येथे लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृती निमित्त आयोजित 'जय जवान जय किसान' व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.महाविद्यालयामध्ये  लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त ११ जानेवारी रोजी  दरवर्षी दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली जाते. ११ जाने. रोजी जय जवान साठी एक जवान आणि १२तारखेला जय किसान साठी एक शेतकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. हे वर्ष या व्याख्यानमालेचे १८ वे वर्ष आहे.
 
        कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ म्हणाले की, "भारतीय नौदलातील माजी उपनौसेना अध्यक्ष मा. व्हाईस अडमिरल मुरलीधर सदाशिव पवार हे एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत.  सातारा येथील चितळी सारख्या ग्रामीण भागात जन्मलेले मुरलीधर पवार देशातील एका उच्च पदावर काम करू शकतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांनी देशासाठी केलेले कार्य,वेगवेगळ्या पदांवरून केलेले आपले कार्य हे आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठी ही महत्वाचे आहे. तरुणांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन देशसेवा केली पाहिजे.तसेच त्यांनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदलाचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांनी देशसेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले." त्याचबरोबर आपल्या स्वरचित कवितेच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे व्हाइस अॅडमिरल मुरलीधर पवार यांच्या नौसेना दलातील कार्याचा गौरव केला.   

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील एनसीसी  विभागाचे प्रमुख मा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. त्यांनी "जय जवान जय किसान" व्याख्यानमाले मागची  भूमिका  विशद केली. 

        


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजया पवार यांनी केले तर आभार डॉ. दीपक जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Thanks for reply