Monday, June 5, 2023

जगाचा पोशिंदा शेतकरी आजही भूकेने व्याकुळ आहे- प्रा.डॉ.ए.के.पाटील

जगाचा पोशिंदा शेतकरी आजही भूकेने व्याकुळ आहे- प्रा.डॉ.ए.के.पाटील                


कराड/प्रतिनिधी: 
            स्वातंत्र्यप्राप्तीवेळी कृषी आणि संलग्न क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा ५० टक्के पेक्षा अधिक होता. त्यानंतर मात्र तो सातत्याने घसरत जाऊन २० टक्के पर्यंत खाली आला. प्रगतशील राष्ट्रांच्या तुलनेत आजही भारतातील राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा हा अधिकच आहे परंतु असे असले तरी १४० कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरविणारा जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र अजूनही भुकेने व्याकुळ आहे. त्याची आर्त  किंकाळी अजूनही व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. हेच या कृषीप्रधान देशाचे दुर्दैव आहे असे भावनिक प्रतिपादन सगाम कॉलेजचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.ए.के. पाटील यांनी केले. 
        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि सगाम महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने लीड कॉलेज अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख साधनव्यक्ती म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा.डॉ.राजाराम कांबळे, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा.सुरेश रजपूत, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.डॉ.मारुती सूर्यवंशी आदी प्रमुख उपस्थित होते. 
        प्रा.डॉ. ए.के.पाटील पुढे म्हणाले, अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच वेळा नैसर्गिक संकटांमुळे शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्था अडचणीत येते. तसेच काही वेळेस अतिरिक्त उत्पादनामुळे देखील शेतकरी व अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल पडसाद उमटतात. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थेने कार्यतत्पर असले पाहिजे असे आग्रही मत त्यांनी यावेळी मांडले. 
        नागठाणे कॉलेजचे प्रा.डॉ.राजाराम कांबळे म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपल्या देशाने अनेक स्थित्यंतरे पाहिली संस्थानिकांचे विलीनीकरण, कल्याणकारी राज्याची संकल्पना, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, हरितक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाचे धोरण, औद्योगीकरण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास असे अनेक प्रकारचे बदल आपण आज पाहतो आहोत. तरीसुद्धा आज मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, बेकारी आपल्या देशात दिसून येत आहे. देशातील मुठभर लोकांच्याकडे जवळपास ८० टक्के संपत्ती आहे. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. 
        अध्यक्षस्थानावरून प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, अर्थतज्ञ हे संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेचे दीपस्तंभ आहेत. आजारी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ते अहोरात्र काम करत असतात. पण त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने देशाला उपयोजित अर्थतज्ञांची गरज आहे. 
        कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.सचिन बोलाईकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.मारुती सूर्यवंशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.जयदीप चव्हाण यांनी तर आभार प्रा.रवीकुमार अवसरे यांनी मानले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक यांनी कार्यशाळेस उपस्थिती दर्शवून कार्यशाळा संपन्न केली.    

फोटो कॅप्शन: 'स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि भारतीय अर्थव्यवस्था' या एकदिवसीय कार्यशाळेत बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.ए.के.पाटील सोबत प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड, प्रा.डॉ.राजाराम कांबळे





No comments:

Post a Comment

Thanks for reply