Monday, June 5, 2023

जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरते - प्रा. प्रतिभा पैलवान

 जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरते - प्रा. प्रतिभा पैलवान                                          


कराड/प्रतिनिधी: 
    बऱ्याचदा जगलेले आयुष्यच काव्यनिर्मितीस पोषक ठरत असते. क्षणोक्षणी नवनवे सुचवत जाते. भावनांची  उत्स्फूर्तता शब्द जुळवत जातात आणि सुरेख अशी काव्यनिर्मिती होते. अनेकदा ही काव्यनिर्मिती इतरांना प्रेरक, मार्गदर्शक ठरत असते. त्या त्या परिस्थितीतील भावनांची गोड कुपी म्हणून सुद्धा लिखित काव्याकडे पाहता येईल. विद्यार्थ्यांनी देखील या काव्य निर्मितीचा आनंद लुटावा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री आणि कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या प्रा.प्रतिभा पैलवान यांनी केले. 

बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभाग व प्रीतीसंगम हास्य परिवार आयोजित कवी संमेलनात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.सौ.उज्वला पाटील, आनंद कलबुर्गी, प्रा.अशोक खोत, प्रा.सुरेश रजपुत आदी होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, कविता हा अतिशय अर्थगर्भ प्रवाह आहे. त्यातील शब्दसौंदर्य, भावसौंदर्य, अर्थसौंदर्य टिपता आले पाहिजे. कविता म्हणजे भावनांचे सादरीकरण असते. वेदना साजरा करणाराच कवी होतो. त्यामुळे वेळीच भावना शब्दबद्ध केल्या तर अप्रतिम काव्य निर्मिती होऊ शकेल असे ते म्हणाले. 

प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील म्हणाल्या, कवी संमेलन हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा महत्त्वाचा उपक्रम असून त्याद्वारे नव्या पिढीकडून मराठी भाषा आपोआपच संवर्धित होईल. 

यावेळी आनंद कलबुर्गी, प्रसाद भस्मे, सचिन कांबळे, श्रुती कांबळे, रोहित कांबळे, प्रा.सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा.अण्णा पाटील, प्रा.अभिजीत दळवी, प्रा.दयानंद कराळे, प्रा.शोभा लोहार, प्रा.स्नेहल वरेकर, प्रा. स्वप्नाली काळे यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.शीतल गायकवाड तर आभार प्रा.शोभा लोहार यांनी मानले. फोटो 

कॅप्शन: 'मराठी भाषा पंधरवडा' दिनानिमित्त कवी संमेलनात मार्गदर्शन करताना प्रा. प्रतिभा पैलवान सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील, आनंद कलबुर्गी आदी मान्यवर..



No comments:

Post a Comment

Thanks for reply