Thursday, February 9, 2023

आत्मचरित्र व्यक्तीला इतरांप्रती संवेदनक्षम बनवतात - प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

आत्मचरित्र व्यक्तीला इतरांप्रती संवेदनक्षम बनवतात - प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड

           
कराड/ प्रतिनिधी : 
            पुस्तक आपली गुरु आहेत. वाचन प्रिय माणसाला पुस्तके आतून बदलायला भाग पाडतात. विशेषतः आत्मचरित्र वाचली तर माणूस इतरांप्रती संवेदनशील होतो. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतात. नकळतपणे आत्मचरित्र आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. विवेकी विचारांची पताका घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे डॉ. बापूजी साळुंखे यांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याला प्रणाम करण्यासाठी आम्ही विवेकदीप: शोध बापूजींचा या परीक्षणात्मक परिसंवादाचे आयोजन केले. त्या माध्यमातून आम्ही बापूजींच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला अशी भावना प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी बोलून दाखवली.                                 
        बापूजी साळुंखे महाविद्यालयात विवेकानंद सप्ताहाची सांगता प्रसंगी विवेकदीप: शोध बापूजींचा या परीक्षणात्मक परिसंवादात ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी प्रा.अशोक खोत, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुरेश यादव, प्रा.सुभाष कांबळे, सुरेश राजपूत आदी. उपस्थित होते.                  डॉ. महेश गायकवाड पुढे म्हणाले, बापूजींनी ज्या समर्पणाच्या भावनेने काम केले त्याच भावनेने गुरुदेव कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. समर्पणाच्या भावनेतूनच बापूजींचे विचार, बापूजींचे काम चिरकाल टिकू शकेल म्हणून बापूजी सातत्याने वाचले पाहिजेत.                         
            चला जगूया विवेकानंद व बापूजी या विषयावर प्राचार्य अरुण कुंभार, जागतिक हवामान बदल व समस्या यावर प्रा.डॉ.प्रवीण तळेकर तर आहार आणि आरोग्य या विषयावर प्राचार्य ईला जोगी यांची व्याख्याने झाली. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर पोस्टर प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन देखील भरविले होते. प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी २०० पेक्षा अधिक ग्रंथांचे  वाटप केले. त्यास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्ञान शिदोरी उपक्रमांतर्गत वक्तृत्व, निबंध, चित्रकला सुगम गायन आदी. स्पर्धांचे देखील आयोजन केले होते. अखेरच्या दिवशी परीक्षाणात्मक परिसंवादात महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी उस्फूर्त सहभाग दर्शवून श्री स्वामी विवेकानंद सप्ताहाची सांगता केली. 



साळुंखे महाविद्यालयाच्या शुभम जाधवला मिनी ऑलिम्पिक मध्ये रौप्यपदक            


कराड/ प्रतिनिधी : 
        श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम जाधव याने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी बालेवाडी, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात ६६ मीटर भाला फेकून नेत्रदीपक कामगिरीकरत रौप्य पदक पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाबरोबरच श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था व बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.   
            श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगीताई गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव सिताराम गवळी, संस्था सी.ई.ओ कौस्तुभ गावडे तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी त्याचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूस मार्गदर्शन केले.                            
                बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा केलेली आर्थिक मदत तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच मी हे यश मिळवू शकलो अशा भावना या खेळाडूने व्यक्त केल्या. या खेळाडूवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो कॅप्शन : 
        मिनी ऑलिंपिकपटू शुभम जाधव याचे अभिनंदन करताना प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड सोबत प्रा.देवदत्त महात्मे.





साळुंखे महाविद्यालयाचा अनिकेत दाते शरीरसौष्ठव स्पर्धेत विद्यापीठ तृतीय.

साळुंखे महाविद्यालयाचा अनिकेत दाते शरीरसौष्ठव स्पर्धेत विद्यापीठ तृतीय.                       


कराड /प्रतिनिधी : 
        श्री स्वामी विवेकानंद शिक्षण  संस्थेच्या कराड येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत किशोर दाते बी.ए भाग-३ याने शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.        
        सदर स्पर्धा शिवराज कॉलेज, गडहिंग्लज येथे १९ जानेवारी रोजी पार पडल्या. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांची प्रेरणा मोलाची ठरली असे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. सदर खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन होत आहे.





हवामान बदलाचा साखर उताऱ्यावर परिणाम: कारखानदारांबरोबर शेतकरी ही अडचणीत- प्रा.डॉ.प्रवीण तळेकर                      


कराड/प्रतिनिधी : 
             पृथ्वीचे वार्षिक सरासरी तापमान नैसर्गिकरीत्या १५ डिग्री सेल्सिअस राखले जाणे आवश्यक आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगीकरण त्यातून होणारे प्रदूषण हरीतगृह वायूंचे उत्सर्जन यामुळे सरासरीपेक्षा ०.६ अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे.  १९०६ ते २००५ या १०० वर्षाच्या कालावधीत जागतिक सरासरी तापमान ०.७४ सेल्सिअस ने वाढल्याचे दिसून आले आहे. ही वाढ सरासरीपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक आहे असे प्रतिपादन हवामान अभ्यासक व  एस.जी.एम कॉलेजचे प्रा.डॉ.प्रवीण तळेकर यांनी केले. 
        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.सुभाष कांबळे होते.    
            डॉ.प्रवीण तळेकर पुढे म्हणाले, तापमान वाढीमुळे हीमनग वितळणे, सागराच्या पातळीत वाढ होणे, मान्सूनवर परिणाम या घटना दृष्टिक्षेपास येऊ लागल्या  आहेत. समुद्राची पातळी १७ सेंटीमीटरने वाढली असून येत्या काही वर्षात ती ८८ सेंटीमीटर पर्यंत वाढणार आहे. समुद्रसपाटीपासून जमिनीची उंची एक ते दोन मीटर एवढीच असलेले मालदीव बेट अत्यंत धोकादायक स्थितीत आलेले आहे.                                       
        हवामान बदलामुळे २०२० पर्यंत आफ्रिकेतील जवळपास २५ कोटी लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर अलीकडे अवेळी आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम ऊस साखर उताऱ्यावरही होत आहे. गेल्या दोन वर्षात साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याने काही कारखाने उशिरा सुरू होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एकंदरीतच ऊस कारखानदारीवरही हवामान बदलाचा परिणाम प्रत्यक्ष दिसून येत आहे.                 
            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबल मध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे पण माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत त्या अगोदरच सूर्याचे भ्रमण हा भास आहे हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. भूगोल हा शब्द देखील ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. त्याचबरोबर पाण्याच्या घर्षणातून वीज निर्मिती ही बाब देखील ज्ञानोबारायांनीच सांगून ठेवली होती. 
            याप्रसंगी भूगोल विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच प्रा.सुभाष कांबळे, प्रा.सुरेश काकडे यांनी भूगोल विभागास पाच हजार रुपये कृतज्ञतानिधी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुभाष कांबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सुरेश काकडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार तर आभार प्रा. डॉ. प्रवीण साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.



इतरांप्रती सकारात्मक आस्था व आचरण हेच सर्वोच्च पुरस्कार -  प्राचार्य अरुण कुंभार 


कराड/ प्रतिनिधी : 
    महामानवांच्या ठिकाणी असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती ही सर्वात महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंद व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी नेहमी सकारात्मक आचरण, समाज बदलाचे ध्येय ठेवले होते. त्यांच्या दृष्टीने मूल्यांचे पालन करणे व पुढील पिढीसाठी सुकर मार्ग तयार करणे हेच सर्वोच्च पुरस्कार होते असे मार्गदर्शक प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार यांनी केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहामध्ये चला जगूया विवेकानंद आणि बापूजी या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सुभाष कांबळे, प्रा. डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.सुरेश रजपूत आदी होते. 
        प्राचार्य अरुण कुंभार पुढे म्हणाले, कार्य तत्परता असेल तरच सिद्धी मिळू शकते आणि कार्यामध्ये सत्य,शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकी आळा ही तत्त्व ओतप्रोत भरली असली पाहिजेत. कोणत्याही कार्याची सिद्धता, समाधान आनंदात परावर्तित करणे हा सर्वोच्च पुरस्कार आहे. विवेकानंद व बापूजी हे मार्गदर्शक गुरु म्हणून त्यामुळेच श्रेष्ठ ठरले. 
        कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, श्री स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हे युवकांचे प्रेरणास्त्रोत आहेत. सदविवेक बुद्धीचा वापर केल्याने कीर्ती व कार्यसिद्धी अल्पजीवन कालावधीत देखील साधली जाते याचे विवेकानंद मूर्तीमंत उदाहरण आहेत. तर बापूजी सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था सर्व स्तरातील लोकांसाठी खुले करणारे महामानव होते. या दोन्ही महामानवांकडून जीवन कसे जगावे परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे याचे सम्यक ज्ञान मिळते. 
        पाहुण्यांचा परिचय प्रा. सुभाष कांबळे यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रा.डॉ. मारुती सूर्यवंशी तर सूत्रसंचालन कु. शितल गायकवाड यांनी केले. आभार प्रा. सुरेश यादव यांनी मानले या वेळी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते                    

फोटो कॅप्शन : 
        'चला जगूया विवेकानंद व बापूजी' या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य अरुण कुंभार सोबत प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी मान्यवर.




विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत  घडविण्यासाठी 'विवेकी' विचारांची गरज- प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड                                                   

कराड/प्रतिनिधी : 
        श्री स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित झालेल्या व डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचाराचे बोट धरून चालणाऱ्या श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड हे संस्कार केंद्र मूल्याधिष्ठित संस्काराची व सुंदर कृतीशील विचारांची शिदोरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विवेकानंदांनी जगभरात भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीला एक नवी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. बलशाली युवा भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले. म्हणूनच विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. आज विवेकानंदांच्या जन्मदिनी विवेकी विचारांचा जागर करूयात आणि सदविवेक बुद्धीने कार्यप्रवण राहू असे प्रतिपादन प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. 

श्री स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त त्यांना अभिवादन करताना डॉ. महेश गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी संत तुकाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक चौगुले सर, कमला नेहरू अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य अनिता पोतदार आणि प्रॅक्टिसिंग स्कूलच्या होगले मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. 
        विवेकानंद जयंती निमित्त कराड शहरातील 'विवेकानंद' शैक्षणिक संकुलाच्या वतीने कराड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथून सकाळ ८.३० वाजता झाली. महाराष्ट्र हायस्कूल, गणपती मंदिर, चावडीत चौक, आझाद चौक मार्गे ही रॅली बापूजी साळुंखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत गेली. तेथे बापूजींना अभिवादन करून ही रॅली प्रभात टॉकीज मार्गे ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन ज्योतिबा मंदिर मार्गे भगवान मुरलीधर मंदिरापर्यंत गेली. तिथून ही रॅली लाहोटी कन्या प्रशाला मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन चावडी चौक मार्गे पुन्हा महाविद्यालयात परतली.          
        सदर रॅलीत विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड शहरातील सर्व शाखांमधील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते. जय जवान जय किसान, बापूजी साळुंखे यांचा विजय असो, विवेकानंद शिक्षण संस्थेचा विजय असो, अशा विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. ढोल ताशांच्या गजरात चैतन्यपूर्ण उत्साही वातावरणात सदर रॅलीचे सांगता झाली. सदर रॅलीत संत तुकाराम हायस्कूल, कमला नेहरू अध्यापक विद्यालय, प्रॅक्टिसिंग स्कूल, कराड व बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांनी सहभाग नोंदवला.            

फोटो कॅप्शन : 
        विवेकानंद जयंती दिनानिमित्त कराड शहरातून काढलेल्या रॅलीला संबोधित करताना प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड सोबत प्राचार्या अनिता पोद्दार, मुख्याध्यापक चौगुले सर, होगले मॅडम आदी. मान्यवर




साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो.- प्रा. डॉ. राजेंद्र लादे.

साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो - प्रा. डॉ. राजेंद्र लादे.


        कराड, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी विभागाच्या वतीने "कथानिर्मिती संकल्पना" या विषयावर अभ्यागत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून के. सी. कॉलेज तळमावले येथील प्रा. डॉ. राजेंद्र लादे उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात कथानिर्मिती कशी होते, कथानिर्मितीसाठी आवश्यक घटक, कथानिर्मितीतील उत्स्फूर्तता व कथानिर्मितीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना असलेल्या रोजगार संधी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला पाटील मॅडम होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्य हा समाज मनाचा आरसा असतो. समाजातील घडणाऱ्या अनेक घडामोडींचे चित्रण आणि त्याचा मानवाशी असणारा संबंध यातून साहित्यनिर्मिती होत असते. सकस साहित्यनिर्मिती नेहमीच चांगल्या समाजउभारणीसाठी उपयुक्त असते. कथा हा वाड्.मयप्रकारही या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दयानंद कराळे यांनी केले तर आभार मराठी विभागाचा विद्यार्थी अक्षय घाडगे यांनी मानले.   

फोटो कॅप्शन : 
        बापूजी साळुंखे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजेंद्र लादे सोबत मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्वला पाटील, प्रा. डॉ. दयानंद कराळे.



'विवेकानंद' शिक्षणसंस्था आणि 'रयत' मुळेच बहुजन मुले शिक्षण प्रवाहात आली- अॅड. उदयसिंह (दादा) पाटील - उंडाळकर.

'विवेकानंद' शिक्षणसंस्था आणि 'रयत' मुळेच बहुजन मुले शिक्षण प्रवाहात आली- अॅड. उदयसिंह (दादा) पाटील - उंडाळकर.                     


कराड /प्रतिनिधी : 
        स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पारतंत्र्यातून मुक्ती मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचे होते. लोकांना शिक्षण दिल्यानेच स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त होईल हे जाणणारी काही जाणकार मंडळी होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात   स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व नंतरच्या काळात देशाची उभारणी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शिक्षणाचा प्रसार काही विभूतींनी केला. त्यात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बहुजन समाजापर्यंत ज्ञानकिरणे पोचवण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था आणि रयत शिक्षणसंस्थेने केले. त्यामुळेच बहुजनांची मुले शिकू शकली असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर यांनी केले. 
        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिराचे उद्घाटक म्हणून शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सी.ई.ओ कौस्तुभजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.अभय जायभाये, कराड पंचायत समितीचे  माजी उपसभापती रमेश देशमुख,  महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच मौजे. कोळे गावच्या सरपंच सौ.भाग्यश्री देसाई, प्राचार्य डॉ.अरुण गाडे, प्रा. सुरेश रजपूत आदी. प्रमुख उपस्थितीत होते. 

        अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर पुढे म्हणाले, एन.सी.सी आणि एन.एस.एस या दोन योजना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांकडून सकारात्मक आणि रचनात्मक काम करून घेतात. यामधून मिळणारे संस्कार पुढे आयुष्यभर पुरतात. आयुष्याला एक योग्य दिशा देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. 
        उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कौस्तुभजी गावडे म्हणाले, विलासराव (काका) पाटील- उंडाळकर हे विकासाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होत. कराड दक्षिणेचा जो कायापालट त्यांनी केला त्यामुळेच जनता सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. कायमच जनसेवेला प्राधान्य दिले. विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात देखील काका संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे उंडाळकर कुटुंबीयांचे ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. आज काका नाहीत पण काकांचा वैचारिक वारसा उदयसिंह (दादा) पाटील मोठ्या समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. 
        शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये म्हणाले, आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून संस्कारक्षम, पथदर्शी काम उभं करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेणे आवश्यक वाटते.              
        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, समाजसेवा आणि देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एन.एस.एस च्या माध्यमातून शिबिरार्थी स्वच्छतेचे काम करतात हीच खऱ्या अर्थाने देशसेवा आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. कोळे गावात देखील आमचे विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करतील अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो.               
        यावेळी उपसरपंच सुधीर कांबळे, माजी उपसरपंच संतोष शिंनगारे, श्रीकृष्ण पाटील, करिष्मा संदे, सुषमा देशमुख, माधुरी साळुंखे, कांताबाई पाटील मुख्याध्यापक यादव सर, काटकर सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.सुभाष कांबळे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा.अभिजीत दळवी तर आभार प्रा.अण्णासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुभाष बोलाईकर तसेच प्रा.दिपाली वाघमारे, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा.संभाजी पाटील प्रा.सौ.वंदना पवार, हरीविवेक कुंभार, पंकज कुंभार यांच्यासहित सर्व राष्ट्रीय सेवा योजना सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

फोटो कॅप्शन : 
    मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना अॅड.उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर सोबत कौस्तुभजी गावडे, प्रा.अभय जायभाये, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सरपंच सौ.भाग्यश्री देसाई आदी. मान्यवर



विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात उंडाळकर कुटुंबीयांची मोलाची साथ - कौस्तुभ गावडे

विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात उंडाळकर कुटुंबीयांची मोलाची साथ - कौस्तुभ गावडे


कराड/ प्रतिनिधी: 
    विलासराव (काका) पाटील- उंडाळकर हे विकासाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होत. कराड दक्षिणेचा जो कायापालट त्यांनी केला त्यामुळेच जनता सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. कायमच जनसेवेला प्राधान्य दिले. विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात देखील काका संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे उंडाळकर कुटुंबीयांचे ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. आज काका नाहीत पण काकांचा वैचारिक वारसा उदयसिंह (दादा) पाटील मोठ्या समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत असे प्रतिपादन श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सी.ई.ओ कौस्तुभजी गावडे यांनी केले.                                

        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर शिबिराचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.अभय जायभाये, कराड पंचायत समितीचे  माजी उपसभापती रमेश देशमुख,  महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच मौजे कोळे गावच्या सरपंच सौ. भाग्यश्री देसाई, प्राचार्य डॉ.अरुण गाडे, प्रा. सुरेश रजपूत आदी. प्रमुख उपस्थितीत होते.

        कौस्तुभजी गावडे पूढे म्हणाले, बापूजींनी मौजे. कोळे गावात जी पुण्याई उभी केली त्याचीच प्रचिती म्हणून गावाने संस्थेच्याच बापूजी साळुंखे महाविद्यालयावर विश्वास ठेवून हे शिबिर आयोजित केले. या बाबीचा मला विशेष आनंद वाटतो. शिबिरार्थी देखील गावाने ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थ करून दाखवतील अशी मला आशा आहे.

        शिबिराचे उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पारतंत्र्यातून मुक्ती मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचे होते. लोकांना शिक्षण दिल्यानेच स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त होईल हे जाणणारी काही जाणकार मंडळी होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व   कालखंडात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व नंतरच्या काळात देशाची उभारणी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शिक्षणाचा प्रसार काही विभूतींनी केला. त्यात शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बहुजन समाजापर्यंत ज्ञानकिरणे पोचवण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेने केले. त्यामुळेच बहुजनांची मुले शिकू शकली. 

        शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये म्हणाले, आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून संस्कारक्षम, पथदर्शी काम उभं करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेणे आवश्यक वाटते.              

    शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, समाजसेवा आणि देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एन.एस.एस च्या माध्यमातून शिबिरार्थी स्वच्छतेचे काम करतात हीच खऱ्या अर्थाने देशसेवा आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. कोळे गावात देखील आमचे विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करतील अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो.               

        यावेळी उपसरपंच सुधीर कांबळे, माजी उपसरपंच संतोष शिंगारे, श्रीकृष्ण पाटील, करिष्मा संदे, सुषमा देशमुख, माधुरी साळुंखे, कांताबाई पाटील मुख्याध्यापक यादव सर, काटकर सर तसेच मौजे कोळे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. सुभाष कांबळे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा. अभिजीत दळवी तर आभार प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष बोलाईकर तसेच प्रा. दिपाली वाघमारे, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. संभाजी पाटील प्रा.सौ. वंदना पवार, पंकज कुंभार, हरीविवेक कुंभार यांच्यासहित सर्व राष्ट्रीय सेवा योजना सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

फोटो कॅप्शन : 
    मौजे. कोळे ता. कराड येथे एन.एस.एस उद्घाटन प्रसंगी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना मा. कौस्तुभजी गावडे सोबत अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर,  प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्रा. अभय जायभाये, सरपंच सौ भाग्यश्री देसाई आदी. मान्यवर.