Monday, June 5, 2023

मराठी भाषेवर मनापासून प्रेम करा, भाषेचा सन्मान करा- प्रा.सुभाष कांबळे

मराठी भाषेवर मनापासून प्रेम करा, भाषेचा सन्मान करा- प्रा.सुभाष कांबळे          


कराड/प्रतिनिधी: 
    वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्याप्रती सद् भावना  म्हणून तसेच मराठी भाषेप्रती प्रेम वृद्धिंगत व्हावे, भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषिकांनी मराठी भाषेवर मनापासून प्रेम करावे हीच या दिवशी मनोकामना बाळगून मराठीचा सन्मान करू असे प्रतिपादन प्रा.सुभाष कांबळे यांनी केले. 

    मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनाच्या औपचारिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.सौ. उज्वला पाटील, प्रा.अशोक खोत, नवोदित साहित्यिक सुरज साठे आदी होते. 

    प्रा.सुभाष कांबळे पुढे म्हणाले, भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पंधरावी तर भारतातील तिसरी भाषा आहे. आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा देखील येणे गरजेचे असले तरी मराठी भाषेचे महत्त्वदेखील टिकवून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. 

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, मराठी भाषेबद्दल आदराची भावना प्रेम दाखवण्यासाठी हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक जनमानसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगाला येणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करता येईल. एकंदरीतच तुमची आमची सर्वांचीच मराठी ही आपलेपणाची भाषा आहे. 

यावेळी महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी नवोदित साहित्यिक सुरज साठे याचा 'मुक्ता साळवे पुरस्कार' मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.महेश गायकवाड, प्रा.डॉ.सौ. उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे यश मिळू शकलो अशा भावना सुरज साठे याने या वेळी व्यक्त केल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. सौ.उज्वला पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.दयानंद कराळे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                
फोटो कॅप्शन: मुक्ता साळवे साहित्य पुरस्कार प्राप्त महाविद्यालयाचा नवोदित साहित्यिक सुरज साठे याचा सत्कार करताना प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड सोबत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.सुभाष कांबळे, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ.उज्वला पाटील, प्रा. अशोक खोत आदी मान्यवर.



No comments:

Post a Comment

Thanks for reply