Tuesday, October 18, 2022

पुस्तकं संस्कृतीचे मस्तक तर ग्रंथालये मंदिर आहेत. - प्रा. श्रीधर साळुंखे (वाडमय मंडळ विभाग)

पुस्तकं संस्कृतीचे मस्तक तर ग्रंथालये मंदिर आहेत. 

 प्रा. श्रीधर साळुंखे                   

कराड/ प्रतिनिधी : 

        मोबाईल  ऐवजी पुस्तकावर बोटं ठेवून वाचलेली अक्षरे काळजाला जाऊन भिडतात. मन शुद्ध करतात. तर गुरुजनांनी खांद्यावर ठेवलेला हात आयुष्याला दिशा देतो. चांगले मित्र जगण्याचे आधार असतात. त्यामुळे पुस्तक, गुरुजन आणि चांगल्या मित्रांची आयुष्यात सोबत करा. तेच तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवतील. विवेकी निर्णय घ्यायला सक्षम बनवतील, अंतर्मनावर संस्कार करतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.              

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे ग्रंथालय विभाग व वाड्मय मंडळाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थिती मा. ऋषिकेश सारडा, मा. जयंत पालकर यांची होती.                        

        डॉ. श्रीधर साळुंखे पुढे म्हणाले, पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक तर ग्रंथालय हे भडकावणाऱ्या डोक्यांना शांत करणारे मंदिर आहे. आयुष्याच्या पाऊलवाटेवर मार्गक्रमण करताना आपण स्वतःला मात्र कधीच फसवू शकत नाही याचेही भान आपल्याला असले पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाचा संस्कार त्यांच्यात रुजावा या हेतूने वाचन कट्टा उपक्रम राबवला जात आहे. वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे, आकलन शक्ती वाढवणारे माध्यम म्हणून पुस्तकांकडे आपल्याला पाहता येईल. पुस्तके आपल्या विचारात नाविन्यता, प्रगल्भता आणतात. ज्ञानसंपन्न व समृद्ध समाजाची जडण घडण ही पुस्तकाशी संबंधित असते. वाचनकट्टा संकल्पना प्रा. विश्वनाथ सुतार यांनी विशद केली. प्रास्ताविक प्रा. डॉ. उज्वला पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सोनाली रांगोळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड तर आभार प्रा. रत्नाकर कोळी यांनी मानले.         

फोटो कॅप्शन : 

        प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना प्रा. श्रीधर साळुंखे सोबत प्र.प्राचार्य डॉ. महेश गायकवाड.














छंदाला योग्य वळण दिले तर नक्कीच आयुष्य घडेल - सिनेअभिनेते सुजित शेख (सांस्क्रुतिक विभाग)

छंदाला योग्य वळण दिले तर नक्कीच आयुष्य घडेल 

         सिनेअभिनेते सुजित शेख               

कराड /प्रतिनिधी : 

            आयुष्यात प्रत्येकाने एखादा छंद जोपासला पाहिजे. याच तुमच्या छंदाला योग्य वळण दिले तर निश्चितच तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळू शकेल. आयुष्यभराच्या चरितार्था सोबतच सामाजिक प्रतिष्ठा व समाधानाची अनुभूती हा छंद तुम्हाला मिळवून देईल. त्यामुळे तुमच्याकडे असणारे कला कौशल्य ओळखा आणि महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करा असे प्रतिपादन झी गौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मा. सुजित शेख यांनी केले.    

            बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. प्रमुख उपस्थितीत शाहीर भानुदास गायकवाड, ढोलकीपटू शुभम दाखले आणि गायिका सृष्टी पाटील आदी होते.                         

            मा. सुजित शेख पुढे म्हणाले, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील गुरुजनांच्या परिसस्पर्शामुळे आम्ही घडलो हे सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. तुम्हीही निश्चितच घडाल यासाठी फक्त महाविद्यालयीन जीवनात जबाबदारीने वागण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि गुरु शोधण्याची गरज आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.                                      

            कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे.  अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने प्रोत्साहन दिले आहे. हीच सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी महाविद्यालये कार्यप्रवण असतात. प्रत्येक महाविद्यालयात कलाकार आणि कलाप्रकार वर्धिष्णू व्हावेत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. याला विद्यार्थ्यांनी देखील तितकीच साद देणे गरजेचे आहे.                                        

            सदर प्रसंगी पाहुण्यांनी विविध समाज प्रबोधनपर गीते, स्फूर्ती गीते, चित्रपट गीते, गझल, कविता सादर करून वातावरण चैतन्याने भारून टाकले होते. संपूर्ण सभागृह रोमांचित झाले होते. महाविद्यालयाचा गुणी कलाकार शुभम काकडे याने देखील तबलावादनाने सर्वांची मने जिंकली. यथोचित अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशा उस्फूर्त भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुभाष कांबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सुरेश यादव यांनी करून दिला. सूत्रसंचालन  प्रा. कु. टी. एम. आत्तार तर आभार प्रा. संभाजी पाटील यांनी मानले. 

फोटो कॅप्शन : 

    सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. सुजित शेख सोबत प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड























Friday, October 14, 2022

आरोग्य ही राष्ट्रीय संपत्ती आहे. - प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील

 आरोग्य ही राष्ट्रीय संपत्ती आहे. 

                - प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील 

कराड/ प्रतिनिधी : 

        आरोग्य ही संपत्ती आहे असे म्हटले जाते आणि ते सर्वार्थाने योग्यच आहे. ज्या व्यक्तीचे शरीर निरोगी असते त्याच्याच आयुष्यात काहीतरी करण्याची ऊर्जा आणि क्षमता असते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागरूक असले पाहिजे. एकंदरीतच आरोग्य ही राष्ट्रीय संपत्ती आहे. सात्विक आहार, व्यायाम त्याचबरोबर वेगवेगळ्या आरोग्य तपासण्या देखील विद्यार्थ्यांनी वेळच्यावेळी करून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांनी केले.                       

        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सचिन बोलाईकर होते. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुदृढ व निरोगी आरोग्याच्या दृष्टीने सदर वैद्यकीय शिबीर आयोजित केले आहे. सुदृढ मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच सतर्क असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशी शिबिरे वेळोवेळी आयोजित केली जातील असेही ते म्हणाले.                                          सदर शिबिराचा 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिरासाठी आरोग्य केंद्रामधील डॉ. ऋचा रेठरेकर, शीला गुरव, अनिता पवार, मनाली जोशी तसेच गायत्री कांबळे यांनी हिमोग्लोबिन टेस्ट, शुगर व ब्लड प्रेशर टेस्ट करून उत्तम सहकार्य केले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. दिपाली वाघमारे, डॉ. शीतल गायकवाड, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. अभिजीत दळवी यांनी यशस्वी नियोजन केले.






सुदृढ मानसिक आरोग्यासाठी सुखद भावना जपा. - प्रा. शिवराम मेस्त्री (मानसशास्त्र विभाग)

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी सुखद भावना जपा. 

             - प्रा. शिवराम मेस्त्री 

कराड/प्रतिनिधी :

            मानसिक आरोग्य ही खूप मौल्यवान संपत्ती आहे. ही संपत्ती आपल्याला जपता आली पाहिजे, कारण मानसिक आरोग्याचा परिणाम हा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबावर व पर्यायाने समाजावर होत असतो. आपली विचारसरणी योग्य असेल तर मानसिक आरोग्य सुदृढ राहते. त्यामुळे सुखद भावना जपा व दुखद भावनांकडे दुर्लक्ष करा. एकंदरीतच मानसिक आरोग्य ही राष्ट्रीय संपत्ती आहे असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा चे माजी मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवराम मेस्त्री यांनी केले.                       

            बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मानसशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य. डॉ. महेश गायकवाड होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. सोमनाथ पाटील होते.                            

            प्रा. मेस्त्री पुढे म्हणाले, जगभरातील वाढत्या आजारांमध्ये मानसिक आरोग्य हा गंभीर विषय बनत चालला आहे. मानवी भावनांची तीव्रता, नकारात्मक भावनांचा वेग आणि भावनांच्या समायोजनाचा अभाव याचा परिणाम मानवाच्या वर्तनावर होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य दिन जगभरात जाणीव जागृती साठी साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य. डॉ. महेश गायकवाड म्हणाले, खरंतर दुःख, वेदना, ताण नसणारी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला ताण आहेच परंतु त्यावर नियंत्रण मिळवले गेले पाहिजे. तणावातून शक्य तेवढे मुक्त राहिले पाहिजे. त्यासाठी स्वतःशी बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. स्वतःचे मानसिक आरोग्य आपण स्वतः सांभाळले तर इतरांचेही आरोग्य आपण अप्रत्यक्षरीत्या सांभाळत असतो हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.              

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोमनाथ पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दयानंद कराळे तर सूत्रसंचालन प्रा. कु. माधुरी वेताळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कु. सविता येवले यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.            

फोटो कॅप्शन: 

    मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना प्रा. शिवराम मेस्त्री सोबत प्र. प्राचार्य. डॉ महेश गायकवाड, प्रा. सोमनाथ पाटील



















मोबाईलच्या वापराने तरुण पिढीचे जगणे एकाकी कोषात... - प्राचार्य. डॉ. एल. जी. जाधव

मोबाईलच्या वापराने तरुण पिढीचे जगणे एकाकी कोषात...

              - प्राचार्य. डॉ. एल. जी. जाधव     

कराड/ प्रतिनिधी:

        प्रचंड वाढती स्पर्धा व मोबाईल मूळे आलेले एकाकी पण तरुण पिढीला नैराश्यग्रस्त करीत आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराने ही पिढी एकाकी होऊन घरात, समाजात व्यक्त व्हायला कुठेतरी कमी पडत आहे. यातून भविष्यात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतील. म्हणून वेळीच यातून मार्ग काढायचा असेल तर तरुणांच्या हाती उत्तम साहित्याने ओथंबलेली पुस्तके दिली पाहिजेत. उत्तम साहित्यच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड चे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांनी केले.                   

        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे भाषा विभागांच्या वतीने वाड्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. डॉ. जाधव पुढे म्हणाले, मनमुराद आनंदी जगण्यासाठी साहित्य मदत करते. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. साहित्य हे माणूस घडवण्याचे काम करत असते. त्यातून पिढीने शिकले पाहिजे. तरुणांना काव्य करता आले पाहिजे, काव्य जगता आले पाहिजे. तरच संवेदना जिवंत राहतील असेही ते याप्रसंगी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, शब्द तेच असतात फक्त त्यांना योग्य जागी बसवता आले, त्यांच्यात जीव ओतता आला तर अप्रतिम साहित्य निर्मिती होते. शब्दांच्या पावसात भिजलात तरच नवीन शब्दांचे अंकुर फुटतील, नवीन साहित्य निर्मिती होऊ शकेल.           

            प्रा. डॉ. सौ. उज्वला पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. रत्नाकर कोळी, सूत्रसंचालन प्रा.सौ सीमा येवले तर आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                            

फोटो कॅप्शन : 

    भाषा विभागांच्या वतीने वाड्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एल.जी जाधव सोबत प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड








साहित्य जगण्याला नवी दिशा अन् उमेद देते. - प्राचार्य डॉ. महेश गायकवाड (मराठी विभाग)

साहित्य जगण्याला नवी दिशा अन् उमेद देते. 

                  - प्राचार्य डॉ. महेश गायकवाड              

कराड/प्रतिनिधी: 

        मराठी साहित्यविश्व खूप व्यापक स्वरूपाचे आहे. साहित्य जगण्याला एक नवीन दिशा देते, उमेद देते. त्यामुळे साहित्याचे वाचन, चिंतन  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून होणे गरजेचे आहे. मराठी साहित्याच्या वाचनातून महाविद्यालयामध्ये सुसंस्कृत विद्यार्थी घडविता येतील, थोडक्यात वाचन, चिंतन हे व्यक्तिमत्व विकासाचे गमक आहे असे प्रतिपादन प्र. प्राचार्य. डॉ. महेश गायकवाड यांनी केले.                                                       

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'साहित्यविश्व' सदराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील, डॉ. दयानंद कराळे आदी. प्रमुख उपस्थित होते. डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, साहित्य हे मनाचे आरोग्य जपण्याचे उत्तम साधन आहे. त्यामुळे वाचन कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल चव्हाण तर आभार प्रियांका यादव हिने मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.  

फोटो कॅप्शन:

    'साहित्य विश्व' सदराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड सोबत मराठी विभागप्रमुख डॉ. सौ. उज्वला पाटील, डॉ. दयानंद कराळे आदी.


















Thursday, October 6, 2022

स्त्रियांचा सन्मान सुसंस्कृत समाजाची ओळख - प्राचार्य डॉ. महेश गायकवाड (सांस्क्रुतिक विभाग)

स्त्रियांचा सन्मान सुसंस्कृत समाजाची ओळख 
                                                    - प्राचार्य डॉ. महेश गायकवाड

कराड, दि. ३ (प्रतिनिधी) - 
        स्त्री ही अबला आहे, असे समाज नेहमी बोलतो. परंतु, वास्तव खूप वेगळे असून आज स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात उच्च पदस्थ आहेतव. भवानी माता ही शौर्याचे, लक्ष्मी हे पैशाचे आणि सरस्वती ही शिक्षणाचे प्रतीक असून पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांचे नेहमी पूजन केले जाते. आता तेच स्थान स्त्रीयांनी स्वकर्तृत्वावर प्राप्त केले असून स्त्रियांचा सन्मान ही सुसंस्कृत समाजाची ओळख आहे, असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले. 
    यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड (हजारमाची) ता. कराड येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शारदीय व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा. सुरेश यादव, प्रा. आण्णासाहेब पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जी. बी. देशमाने, शिक्षक ए. एल. लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ. गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने कार्य करावे. आत्मविश्वास गमावला की न्यूनगंड तयार होतो. तुमच्या मनात आत्मविश्वास असेल; तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. ज्याप्रमाणे आग आपल्या उष्णतेच्या साह्याने सोन्याला उजळून टाकते. अगदी त्याचप्रमाणे स्वयंशिस्त कोणत्याही विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व चमकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून यश गाठायचे असेल; तर स्वयंशिस्त हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.