Monday, November 28, 2022

तरुणांमध्ये संविधानाची मूल्यं रुजविणे हाच संविधान दिनाचा उद्देश - प्रा. अजित पवार (राज्यशास्त्र - २६ नोव्हेँबर)

तरुणांमध्ये संविधानाची मूल्यं रुजविणे हाच संविधान दिनाचा उद्देश - प्रा. अजित पवार

कराड /प्रतिनिधी : 

        भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे एक प्रकारे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. अजित पवार यांनी केले.                                          

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सचिन बोलाईकर,  प्रा. अवधूत टिपूगडे होते.                            

        प्रा. अजित पवार पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेवर इंग्लंड, अमेरिका, फ्रेंच आणि रशियन राज्यघटनांचा प्रभाव पडलेला आहे. वेगवेगळ्या विचारसरणी आपल्या राज्यघटनेत आल्यामुळे भारतीय राज्यघटना सर्वसमावेशक झाली आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार सरकारला असला तरी मूळ चौकट बदलण्याचा अधिकार सरकारला नाही. असेही प्रा. अजित पवार म्हणाले.                                 

         कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील ६० देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केले आहे. असे असले तरी संविधानाचा आत्मा मात्र भारताच्या मातीतलाच आहे. भारतीय संविधानाने विविध जाती धर्मांना सलोख्याच्या धाग्याने गुंफले आहे. त्यामुळेच भारतीय लोकशाही अभेद्य आहे. या संविधानाने जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे हे देखील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तेव्हा कर्तव्य पालनाचे भान आपण ठेवूया. 

        याप्रसंगी संविधानाने दिलेले 'मूलभूत कर्तव्य' या विषयावरील  भित्तीपत्रिकेचे उद्घाटन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रा. राजेंद्र भिसे यांनी यावेळी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोरख गायकवाड तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. महेश लोहार यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. युवराज कापसे तर आभार डॉ. ज्योती कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                                               

फोटो कॅप्शन : 

        संविधान दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. अजित पवार सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. अवधूत टिपूगडे, प्रा. राजेंद्र भिसे आदी.















Friday, November 25, 2022

बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शुभम जाधव याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शुभम जाधव याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

कराड/ प्रतिनिधी: 

        श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम रामचंद्र जाधव बी.ए भाग २ याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ऋषिकेश साखरे बी.ए भाग ३ या विद्यार्थ्याने देखील  गोळाफ़ेक  या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

        शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सदर आंतरविभागीय स्पर्धा राजे रामराव महाविद्यालय, जत जिल्हा सांगली येथे ७ ते ९ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. यापैकी शुभम जाधव याची निवड पुन्हा ३ डिसेंबर २०२२ पासून औरंगाबाद येथे होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी झाली आहे.  अश्वमेध स्पर्धेसाठी भालाफेक या क्रीडा प्रकारात त्याची शिवाजी विद्यापीठ संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.                                        

        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूस मार्गदर्शन केले. बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो अशा भावना सदर खेळाडूंनी व्यक्त केल्या. या दोन्ही खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन सेवक, विद्यार्थी वर्गाकडून  अभिनंदन होत आहे.





Monday, November 21, 2022

बदलत्या परिस्थितीत पदवी बरोबरच विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे आवश्यक - प्रा. डॉ. भरत पाटील

बदलत्या परिस्थितीत पदवी बरोबरच विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे आवश्यक - प्रा. डॉ. भरत पाटील                         

कराड/ प्रतिनिधी : 

         जागतिकीकरणामुळे औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी वाणि ज्य व व्यवस्थापन शाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत मात्र बदलत्या परिस्थितीत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पदवी बरोबरच सचोटीने व कौशल्यपूर्णतेने काम करण्याची क्षमता असली पाहिजे असे प्रतिपादन कन्या महाविद्यालय कडेगाव येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. भरत पाटील यांनी केले.

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित 'वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी' या विषयावर ते प्रमुख साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रा. जी.आर. वास्के हे प्रमुख उपस्थितीत होते.              

        याप्रसंगी प्रा. जी. आर. वास्के म्हणाले, कॉमर्स विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट या करिअर व्यतिरिक्त मार्केटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, एच आर, अकाउंट्स, ऑडिट, बिझनेस टॅक्सेशन, कम्युनिकेशन, कॉस्टिंग या सर्व बाबींकडे प्राधान्याने पाहणे गरजेचे आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे बदलत्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी एक संधी म्हणून पहावे. शासन देखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असे धोरण राबवत आहे.                   

        सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर तर पाहुण्यांची ओळख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. तबस्सुम आत्तार व आभार डॉ. रणजीत लिधडे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. अशोक खोत, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. महेश लोहार, प्रा. कापसे आदींनी प्रयत्न केले.           

फोटो कॅप्शन : 

            कॉमर्स शाखेतील करिअरच्या संधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. भरत पाटील, प्रा. जी.आर. वास्के सोबत प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर आदी. मान्यवर









बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे ए. डी. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धेत यश

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे ए. डी. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धेत यश                              

कराड/ प्रतिनिधी : 

        भारताच्या औद्योगिक विकासाचा जेव्हा इतिहास अभ्यासला जातो तेव्हा अर्देशीर दरबशा श्रॉफ उर्फ ए. डी. श्रॉफ या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाचे नाव प्राधान्याने घेतले जाते. भारतातील एक नामांकीत अर्थतज्ञ व पर्यावरणवादी म्हणून आजही त्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. त्यांच्याच संकल्पनेतून देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आर्थिक विषयांवर विचार करण्यास व बोलण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ए. डी. श्रॉफ मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ए.डी. श्रॉफ स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धांचे देशभरात आयोजन केले जाते.               

            शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे नुकत्याच या ५६ व्या ए.डी.श्रॉफ वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कु. युक्ता कांबळे हिने प्रथम क्रमांक (२५०० रुपये रोख व प्रमाणपत्र) द्वितीय क्रमांक कु. ऋतिका चाळके (१५०० रुपये रोख व प्रमाणपत्र) तृतीय क्रमांक सचिन कांबळे (१००० रुपये रोख व प्रमाणपत्र) तर कु. वैशाली चव्हाण, कु. श्रुती कांबळे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच प्रा. विश्वनाथ सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्पर्धा पार पडल्या.        

        स्पर्धेसाठी कोरोना काळातील अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन, २०१७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचे ५ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष, विकसनशील देशांच्या वित्तपुरवठ्यात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची बदललेली भूमिका तसेच सायबर गुन्ह्यांचा वाढता उपद्रव व त्यावरील उपाय योजना असे चार विषय होते.           .

        स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर, डॉ. दयानंद कराळे यांनी काम पाहिले. तर स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. सविता येवले यांनी परिश्रम घेतले.  यशस्वी स्पर्धकांचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन : 

        ए.डी. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा देताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे आदी. मान्यवर





 







Wednesday, November 2, 2022

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश (शिवाजी विद्यापीठ - सातारा विभागीय क्रीडा 58 व्या मैदानी स्पर्धा 2022-23)

शिवाजी विद्यापीठ 

सातारा विभागीय क्रीडा 58 व्या मैदानी स्पर्धा 2022-23 

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विभागीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश 


कराड /प्रतिनिधी : 

        श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश साखरे बी.ए भाग-३ याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या सातारा विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळा फेक व थाळीफेक या क्रीडा प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. तर शुभम जाधव बी.ए भाग- २ याने देखील भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.                     

        सदर स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम, सातारा येथे २ ते ४ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. या विजयी खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धांसाठी झाली आहे. आंतरविभागीय स्पर्धा राजे रामराव महाविद्यालय, जत येथे ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.                                            महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांची प्रेरणा मोलाची ठरली असे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. सदर खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन होत आहे.










शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड महाविद्यालयास एन. सी. सी. युनिट मंजूर

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

महाविद्यालयास एन. सी. सी. युनिट मंजूर !!

कराड :  

        येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयास या वर्षी सन २०२२-२३ पासून एन.सी.सी. (राष्ट्रीय छात्र सेना)  युनिट मंजूर झाले आहे. महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. ए., बी. कॉम तसेच इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

👉🏼 पोलीस भरती, सैन्य भरती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

👉🏼 तीन वर्षे एन.सी.सी. पूर्ण केल्यानंतर C सर्टिफिकेट प्राप्त विद्यार्थ्यांना पोलिस भरती मध्ये बोनस पाच गुण तसेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर B सर्टिफिकेट प्राप्त विद्यार्थ्यांना बोनस तीन गुण मिळणार आहेत.

👉🏼 सैन्य भरती GD Soldier भरती  मध्ये लेखी परीक्षा माफ होते.  तसेच आर्मी ऑफिसर होण्यासाठी फक्त SSB written exam माफ होते. 

👉🏼 इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा पाच अतिरिक्त गुण एन.सी.सी. कॅडेट्सना मिळतात. 

👉🏼 यांशिवाय विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त आणि व्यक्तिमत्व विकास एन. सी. सी. मधून केला जातो.

राष्ट्रसेवा व राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या एन.सी.सी .मध्ये सहभागी होऊन आपले उज्ज्वल भवितव्य सुनिश्चित करा. 

👉🏼 आपल्या महाविद्यालयातील एन.सी.सी .युनिट साठी कॅडेट्सचे सिलेक्शन 4 नोव्हेंबर या तारखेला होणार आहे.

👉🏼 त्यासाठी नाव नोंदणी व पूर्वतयारी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी उद्या दिनांक 2नोव्हेंबर 2022 रोजी महाविद्यालयात उपस्थित राहून नोंदणी करावी.

👉🏼 एन. सी .सी .च्या पहिल्या वर्षी फक्त 12 विद्यार्थी आणि 6 विद्यार्थिनींना प्रवेश मिळणार आहे.

👉🏼 एनसीसी प्रवेशासाठी साठी इयत्ता अकरावी तसेच बी.ए. भाग 1, बी.कॉम. भाग 1 चे विद्यार्थी पात्र आहेत.

- प्राचार्य डॉ. महेश गायकवाड



राष्ट्रीय एकता दौड शासनाचा प्रभावी उपक्रम - प्राचार्य डॉ. महेश गायकवाड

राष्ट्रीय एकता दौड शासनाचा प्रभावी उपक्रम 

- प्राचार्य डॉ. महेश गायकवाड                                            

कराड/ प्रतिनिधी: 

            सरदार वल्लभभाई पटेल यांचे  स्वातंत्र्य चळवळीतील तसेच  देशाची एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने राष्ट्रीय एकता दौड चे देखील आयोजन केले जाते. परस्पर सलोखा आणि एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हा शासनाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद  असल्याचे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले.                                       

            बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.                            

            प्राचार्य डॉ. महेश गायकवाड पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर खाजगी संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणण्यात वल्लभभाई पटेल यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळेच एकसंघ भारताची निर्मिती होऊ शकली. या आयोजनामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि आजादी का अमृत महोत्सवाची भावना देशभर पोहोचण्यास मदत होईल.           

            राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने सामूहिक स्वरूपात राष्ट्रीय एकता दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली तर त्याचबरोबर एकता दौडचेही आयोजन करण्यात आले होते. प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रा. अभिजीत दळवी, डॉ. शीतल  गायकवाड, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. दिपाली वाघमारे यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.                             

फोटो कॅप्शन : 

        राष्ट्रीय एकता दौडच्या निमित्ताने उपस्थित प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी.