Monday, June 5, 2023

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सॉफ्ट स्किल आत्मसात करणे गरजेचे - प्राचार्य डॉ.सतीश घाटगे

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सॉफ्ट स्किल आत्मसात करणे गरजेचे- प्राचार्य डॉ.सतीश घाटगे


कराड/प्रतिनिधी: 
    स्पर्धा परीक्षांकडे सर्वात कठीण परंतु प्रतिष्ठेच्या परीक्षा म्हणून पाहिले जाते. कोणाला या परीक्षांमध्ये आयुष्याचा अर्थ दिसतो, कोणाला सत्तेचा राजमार्ग तर काहींना जनसेवेची संधी दिसते. उमेदवारांचा दृष्टिकोन काहीही असला तरी या परीक्षांचे आकर्षण मात्र कायम आहे. खरंतर या नोकरी देण्याच्या परीक्षा नसून सक्षमपणे देश चालवण्यासाठी प्रगल्भ उमेदवार निवडीच्या परीक्षा आहेत असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरजचे प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांनी केले.                    

बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग आणि सगाम महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने लीड कॉलेज अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख साधनव्यक्ती म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रा.डॉ.दीपक नगरकर, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा.सुरेश रजपूत, प्रा.सचिन बोलाईकर, प्रा.रत्नाकर कोळी आदी. प्रमुख उपस्थित होते. 

प्राचार्य डॉ.सतीश घाटगे पुढे म्हणाले, या परीक्षांमध्ये पद, पैसा, सामाजिक प्रतिष्ठा असे सर्व काही आहे मात्र यासाठी उमेदवारांकडे सर्वसमावेशक अभ्यासाबरोबरच हार्ड स्किल आणि  सॉफ्ट स्किल असणं खूप गरजेच आहे. स्वच्छ पारदर्शी कामकाज, प्रामाणिकपणा, कौशल्यपूर्णता, अधिक क्षमता, समानूभूती, स्वजाणीव, नवनिर्मिती विचार प्रक्रिया, उत्तम संभाषण कौशल्य, वैचारिक टीकात्मता, निर्णयक्षमता, समस्यासमाधान आदी सारखी १५० पेक्षा अधिक सॉफ्ट स्किल असलेला उमेदवार देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. त्यामुळे आजकाल सॉफ्ट स्किल आत्मसात करणे खूप महत्त्वाचं ठरत आहे. 

वेणूताई चव्हाण कॉलेज चे प्रा.डॉ.दीपक नगरकर म्हणाले, स्पर्धा परीक्षांमध्ये मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी बायोडाटा, रिझ्युम, क्युरीक्युलम व्ह्यायटे यातील महत्त्वाचा फरक समजावून घेतला पाहिजे. आपल्या सीव्ही मध्ये जाणीवपूर्वक आपली बलस्थाने अधोरेखित केली पाहिजेत जेणेकरून मुलाखतकार त्याच अनुषंगाने प्रश्न विचारू शकेल आणि उमेदवार आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरा जाऊ शकेल. मुलाखतीमध्ये विशेषतः तुमचा आत्मविश्वास, नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन, देहबोली एकूणच तुमचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे समोर येणे गरजेचे असते.                      

अध्यक्षीय स्थानावरून प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, प्रचंड वेगाने वाढत चाललेल्या या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम असले पाहिजे. त्यासाठी सॉफ्ट स्किल बरोबरच हार्ड स्किल विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. 

कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.कु. माधुरी वेताळ, प्रा.अभिजीत दळवी यांनी करुन दिला. कार्यशाळेची संकल्पना प्रा.रत्नाकर कोळी यांनी मांडली. सूत्रसंचालन प्रा.कु.स्नेहल वरेकर यांनी तर आभार प्रा.तबस्सुम आत्तार यांनी मानले. सदर कार्यशाळेस तळमावले तसेच उंडाळे कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक विशेष उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक यांनी कार्यशाळेत उपस्थिती दर्शवून कार्यशाळा संपन्न केली. 

फोटो कॅप्शन: बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सतीश घाटगे.



No comments:

Post a Comment

Thanks for reply