Wednesday, January 4, 2023

स्त्री जगताची 'आई' आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे. - सुरेखा शेजवळ (कराड मधील साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार)

स्त्री जगताची 'आई' आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे. - सुरेखा शेजवळ (कराड मधील साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार)                

कराड/प्रतिनिधी: 

        अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे अज्ञानाला दूर करण्यासाठी, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, जातीभेद यासारखे प्रश्न पारतंत्र्याच्या काळात २०० वर्षांपूर्वी एखाद्या स्त्रीने घेऊन प्रस्थापित व्यवस्थेला शह देणे तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण सावित्रीबाईंनी ते करून दाखवलं. त्यामुळे आजची  स्त्री जोखडातून मुक्त झाली. म्हणूनच आज दोन शतकानंतरही सावित्रीबाई प्रत्येक स्त्रीचा हळवा कोपरा आहे. सावित्री प्रत्येक स्त्री चे दैवत आहे. सावित्री स्त्री जगताची 'आई' आहे आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे असे भावनिक प्रतिपादन आदर्श शिक्षिका सुरेखा राजेंद्र शेजवळ यांनी केले.                 

         बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित सावित्रीच्या लेकींचा सत्कार समारंभ प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत माजी मुख्याध्यापिका शुभदा नारायण गायकवाड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. सुरेखा शेजवळ पुढे म्हणाल्या, आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांचे कार्य व विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा हा समस्त स्त्री जातीच्या स्वातंत्र्यासाठी दिला होता. हे मनोमन स्मरण करणे गरजेचे आहे. विशेषतः महाविद्यालयीन युवतींनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

            शुभदा गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाल्या, मळलेल्या वाटेने न जाता, सर्वसामान्य जीवन न जगता समस्त बहुजन समाजाच्या निरक्षरतेच्या बेड्या तोडण्याचे काम फुले दांपत्याने केले. पुढे हाच वसा बापूजींनी जपला व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साक्षरतेचे काम पुढे चालू ठेवले. आज त्याच सावित्रीच्या व बापूजींच्या पुण्याईवर आम्ही उभे आहोत हे सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या कार्याची परिपूर्ती सावित्रीबाईं मुळेच होऊ शकली. सावित्री ज्योतिबांच्या कार्याची खरी प्रेरणा व ऊर्जा होत्या. आज समाजात सावित्रीबाईंच्या कामाचा लहानसा का होईना वाटा उचलणाऱ्या सावित्रीच्या लेकी आहेत. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज अशा लेकींचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.  धनश्री कुलकर्णी, धनश्री पाटील, रेखा सूर्यवंशी, रूपाली जाधव, ऐश्वर्या पाटणकर व प्रियांका यादव या सावित्रींचा वसा जपणाऱ्या लेकींचा  शुभदा गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सुरेश यादव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.यू.आर.पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.शोभा लोहार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.टी.एम.आतार यांनी केले तर आभार सौ. एस.पी.काळे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन: 

सावित्रीच्या लेकींचा सत्कार करताना, मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सुरेखा राजेंद्र  शेजवळ, शुभदा नारायण गायकवाड, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी मान्यवर.









https://www.facebook.com/100085440955380/videos/1237913230136335/?mibextid=Nif5oz







इंद्रजीत देशमुख साहेबांचे बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही प्रयत्नशील - राहुल पाटील (घारेवाडी येथे बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे एकदिवसीय शिबिर संपन्न)

इंद्रजीत देशमुख साहेबांचे बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही प्रयत्नशील -  राहुल पाटील   (घारेवाडी येथे बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे एकदिवसीय शिबिर संपन्न)               

कराड/प्रतिनिधी: 

        सध्या देशभरात जात, धर्म, प्रांतांमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या दरी निर्माण करण्याचे काम होत आहे. पण शिवम आध्यात्मिक सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मनं जोडण्याचा, मानवतावाद जपण्याचा, सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम मा. इंद्रजीत जी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत. आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती, मानवतावाद, पर्यावरण संरक्षण प्रबोधनातून हजारो युवकांना आम्ही सकारात्मक जगण्याचा कृतीशील मार्ग दिला आहे. एकंदरीतच विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झालेली आमची संस्था बलशाली भारत घडवण्यासाठीच सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवत आहे असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.                     

        शिवम प्रतिष्ठान मध्ये झालेल्या एक दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी सचिव प्रताप भोसले, खजिनदार प्रताप कुंभार, विश्वस्त दत्तात्रय पवार, धनंजय पवार तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी. उपस्थित होते. राहुल पाटील पुढे म्हणाले, गेली वीस वर्षांपासून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर तरुणाईला सजग करत आहोत. समाज प्रबोधनपर विकासात्मक उपक्रम राबवित आहोत. प्रतिष्ठान मधून अधिकारी होऊन गेलेले तसेच समाजात विविध स्तरावर काम करणारे आमचे युवक समाजभान जपत काम करीत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.                         

        प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रभर चाललेले शिवम प्रतिष्ठानचे कार्य थक्क करणारे आहे.  शिवमची कार्यपद्धती समाजातील सर्वांनाच प्रेरक, ऊर्जा देणारी आहे. या प्रतिष्ठान मध्ये येणारा युवक कधीच वाम मार्गाला लागू शकत नाही. एवढी ताकद शिवमच्या उपक्रमांमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला कायमच आमच्या विद्यार्थ्यांसाठी शिवम सोबत काम करणं गौरवास्पद वाटते. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही देखील श्रमसंस्कृती जपणारे, समाजकेंद्री विचाराचे विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. साळुंखे महाविद्यालयातील शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी देश प्रेमाचे नारे देत, स्फूर्तीगीते गात, उत्साही, चैतन्याने भरलेल्या वातावरणात श्रम सोहळा रंगविला. घारेवाडी येथे होऊ घातलेल्या युवा हृदय संमेलनाच्या दृष्टीने संपूर्ण परिसर स्वच्छतेचे काम करण्यात आले. विशेष करून वृद्धाश्रम परिसराची स्वच्छताही करण्यात आली. यावेळी धनंजय पवार, दत्तात्रय पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.अण्णा पाटील, प्रा.संभाजी पाटील, प्रा.सुभाष कांबळे, प्रा.दयानंद कराळे, हरीविवेक कुंभार, पंकज कुंभार, डॉ.अवधूत टिपूगडे, प्रा.गोरख गायकवाड, प्रा.युवराज कापसे, डॉ. लीधडे,  प्रा.शोभा लोहार, प्रा. स्नेहल वरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.




ही सगळी पी. डी. पाटील साहेबांची पुण्याई...प्रकाश (बापू) पाटील

ही सगळी पी. डी. पाटील साहेबांची पुण्याई...प्रकाश (बापू) पाटील.                          

कराड /प्रतिनिधी: 

        कराडच्या क्रीडाक्षेत्राची भरभराट व्हावी म्हणून आमचे सातत्याने प्रयत्न चालू असतात. नवनवीन खेळांना तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना आजपर्यंत आम्ही प्रोत्साहन देत आलो आहे. यामुळेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आम्हाला तयार करता आले. आजअखेर कर्तव्य भावनेने काम करत आलो आणि पुढेही हाच वसा आम्ही निसंकोच जपू. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर हे सगळं पी.डी.पाटील साहेबांच्या पुण्याईने चाललं आहे. असं सांगायला देखील आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ सिनेट मेंबर व शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश (बापू) पाटील यांनी केले.                            

        सातारा विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्राचार्य डॉ. एल.जी.जाधव, प्रा.स्मिता कुंभार, प्रा. अशोक खोत, शशिकांत पाटील आदी. उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना साळुंखे महाविद्यालयाचे  प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, कराड शहरातील अधिकाधिक मुले क्रीडा क्षेत्राकडे वळावीत म्हणून प्रकाश बापूंचे सातत्याने प्रयत्न चालू असतात. कायमच कार्यमग्न असणारे हे व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तत्कालीन कालखंडात विवेकानंद शिक्षणसंस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना पी.डी. पाटील साहेबांची  सातत्याने शैक्षणिक मदत मिळाली होती. पी.डी.पाटील साहेबांचे प्रेम, सहकार्य, कृपाआशीर्वाद आमच्या कराड मधील शैक्षणिक संकुलास मिळाले होते. त्याबद्दल आम्ही कायमच त्यांच्या ऋणात राहू.                      

            औपचारिक कार्यक्रमानंतर सॉफ्टबॉल मैदानाचे उद्घाटन झाले. सर्वच सामने अत्यंत चुरशीचे झाले. स्पर्धेतील अंतिम सामना वाय.सी. कॉलेज, कराड विरुद्ध एस.जी.एम कॉलेज, कराड या दोन संघात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात वाय.सी.कॉलेज, कराड च्या संघाने एस.जी.एम. च्या संघावर ११ विरुद्ध ०९ धावांनी निसटता विजय मिळवला. पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक शशिकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. विजेते संघ महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेस पात्र ठरले आहेत.                          

            स्पर्धेत पंच म्हणून अक्षय कदम, अजय कदम, विशाल नलवडे यांनी काम पाहिले. यावर्षी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड कडे यजमानपद होते. साळुंखे महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध व नेटक्या नियोजनाबाबत प्रकाश (बापू) पाटील यांनी यजमान साळुंखे महाविद्यालयाचे हार्दिक अभिनंदन केले.  प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे, प्रा.विश्वनाथ सुतार यांच्यासहित जिमखाना कमिटीच्या सर्व सदस्यांनी सर्वतोपरी नियोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडल्या. 

फोटो कॅप्शन : 

सातारा विभाग स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रकाश (बापू) पाटील, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्राचार्य एल.जी.जाधव, शशिकांत पाटील आदी मान्यवर..

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश.                 

कराड/प्रतिनिधी: 

    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या चार मल्लांनी स्पर्धेत धवल यश संपादन केले आहे. फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात महाविद्यालयाचा बी.ए. भाग १ चा खेळाडू रमेश दामा याने तृतीय क्रमांक पटकावला    आहे. तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात बी.ए. भाग ३ चा खेळाडू आदित्य शिंदे याने ८२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक, बी.ए. भाग २ चा खेळाडू पृथ्वीराज पवार यांने तृतीय क्रमांक तर शहानवाज आगा याने ९२ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला.                     

    सदर सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव येथे ८ ते १० डिसेंबर दरम्यान पार पडल्या. या चौघा विजयी खेळाडूंची निवड शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. आंतर विभागीय स्पर्धा वाय.सी.कॉलेज, कराड येथे १५ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.               बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी सदर खेळाडूंना आंतरविभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन सेवक, विद्यार्थी तसेच विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.