Monday, June 5, 2023

सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी आपले आरोग्य जपावे- प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप

 सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी आपले आरोग्य जपावे- प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप              


कराड/प्रतिनिधी : 
    खरंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिला सक्षमपणे सांभाळत असतात. त्यामुळेच अलीकडे महिलांमध्ये अतिताणामुळे आरोग्याच्या दृष्टीने अधिक तक्रारी येऊ लागल्या आहेत. विशेषत: महिलांमध्ये हिमोग्लोबिन पातळी कमी दिसून येत आहे. त्यामुळे सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्याशिवाय महिलांनी नाती देखील सक्षमपणे सांभाळली पाहिजेत तरच कुटुंबव्यवस्था टिकून राहील. समाजात वृद्धाश्रम राहणार नाहीत असे प्रतिपादन सगाम महाविद्यालय, कराडच्या  प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप यांनी केले.            महिला दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्या अनिता पोतदार, प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील, प्रा.अशोक खोत आदी होते.                 
        प्रा.डॉ.कोमल कुंदप पुढे म्हणाल्या, स्त्री आयुष्यात जेव्हा यश मिळवून दाखवते तेव्हा तिचा सर्वप्रथम सन्मान करणारे तिचे वडील असतात. त्यानंतर भाऊ व पती असतो. आज समाजात महिला दिन साजरा करावा लागतोय हेच खरं दुर्दैव आहे. महिलांना रोज कुटुंबात योग्य तो आदर मिळणे ही जबाबदारी खरंतर  पुरुषांची आहे. पुरुषांनी देखील याचे योग्य ते भान ठेवायला हवे. 
        कमला नेहरू अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या अनिता पोतदार म्हणाल्या, निसर्गाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक सहनशीलता दिली आहे. सक्षमता दिली आहे. परंतु समाजात तिला नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. याकरीता स्त्रियांबद्दल असणारी समाजाची नकारात्मक मानसिकता बदलली गेली पाहिजे.                         
        प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, संपूर्ण जगभरातील महिलांबद्दल आदर,अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. खरंतर महिलांचे हक्क त्याचबरोबर त्यांचे शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
        याप्रसंगी महिला दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्राध्यापिका यांचा यथोचित गौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. सौ उज्वला पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.सचिन बोलाईकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.कु.दिपाली वाघमारे यांनी केले तर आभार प्रा.सोनाली रांगोळी यांनी मानले. महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. 

फोटो कॅप्शन: बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.कोमल कुंदप सोबत प्राचार्या अनिता पोतदार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड आदी मान्यवर.



1 comment:

Thanks for reply