Monday, June 5, 2023

मोबाईलमुळे जग जवळ येतंय पण लेकरं मात्र आई-बापापासून दुरावत आहेत. - इंद्रजीत देशमुख

 मोबाईलमुळे जग जवळ येतंय पण लेकरं मात्र आई-बापापासून दुरावत आहेत. - इंद्रजीत देशमुख          


कराड/प्रतिनिधी: 
        स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक थोर विभूतींनी मोठं मोठी स्वप्न पाहिली. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविले, पण अलीकडच्या ७५ वर्षात आमची स्वप्न मात्र खुजी झाली. आत्मकेंद्री राहिली. मी आणि माझे कुटुंब बस एवढेच! त्यात संस्कारांचे पतन आणि समाजभान देखील आम्ही हरपत चाललो आहोत. तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आलं पण लेकरू मात्र आई-बापापासून खूप दूर चाललं आहे. भावनाशून्य शिक्षण हे शिक्षणाचे ध्येय कधीच नव्हते पण आमचा तरुण या भावभावनांपासून देखील दूर चालला आहे. कुटुंबव्यवस्था देखील हा मोबाईल मोडकळीस आणतो की काय, अशी भीती आता ज्येष्ठांना सतावू लागली आहे. तेव्हा पोरांनो माघारी फिरा असे भावनिक आवाहन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी केले.
        शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे होते. तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते.
            इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले, सुरुवातीच्या काळातले शिक्षण हे जीवनशिक्षण होते. ६४ कला शिकविणारे होते. खरंतर आईच्या शब्दातूनच मूल्य संस्काराला सुरुवात होत होती. पण आम्ही मात्र आता पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षणाचे  अवमूल्यन केले. इतरांबद्दल प्रेम आणि इतरांच्या दुःखाने डोळ्यात पाणी येणं आता संपत चाललं आहे. फक्त माहिती म्हणजे शिक्षण नव्हे तर शहाणपण, चेतनेचा विकास हेच खरं शिक्षण आहे. तरुणांचे भावनिक विश्व कस सुदृढ करता येईल यावर तज्ञांना देखील आता काम करावं लागत आहे. हे मोठं दुर्दैव आहे.                भारतातील तरुणांचे मोबाईल रोज सरासरी १३ ते १४ तास चालू असतात. सरासरी झोप तीन तासांवर येऊन थांबली आहे. जंगली रमी रोज २० ते २५ आत्महत्या घडवून आणत आहे. सेल्फी दररोज ३० ते ३५ आत्महत्या करायला लावत आहे. नेटफ्लिक्सला तरुणांची झोप संपवायची आहे. तरुणांच्या डोक्यात हिंसा घालायची आहे. व्हाट्सअॅप, फेसबुक विद्यापीठाने तर आमची पोरं संपवली आहेत. दुसऱ्या बाजूला पालकांनी देखील घरात येणारा पैसा पारदर्शक आणायला हवा तरच तेथे मूल्यांची उंची वाढलेली असेल. तेव्हा समाजभान असणाऱ्या व्यक्ती आपण घडवूया. तरच जग वाचेल असेही ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे म्हणाले, सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा ही पंचसूत्री सर्वांनी आचरणात आणली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाचे मूल्य हे संस्कारावर ठरत असते. संस्कारपूर्ण आणि समाजाबद्दल आपलेपणाची भावना असणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने समाजाला विधायक दिशा देऊ शकते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणातून संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबविला पाहिजे. विद्यार्थ्यांना समाजशील बनवणे ही खरी शिक्षकांची कसोटी असून त्याबाबत शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे.
        महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, अशा विधायक उपक्रमातून आम्हाला बापूजींचे संस्मरण अधिक प्रकर्षाने होते व त्यातून कार्यप्रवण होण्यासाठी अधिकची ऊर्जा मिळते. बापूजींचे विचार जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू आणि बापूजींच्या विचारांजवळ जाण्याचे आत्मिक समाधान मिळवू असेही ते म्हणाले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शोभा लोहार यांनी तर आभार प्रा.सुरेश रजपूत यांनी मानले. व्याख्यानास शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. व्याख्यानमालेस संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन प्राचार्य एन.जी.गायकवाड, प्राचार्य एस.के.कुंभार, प्राचार्य आर.के.भोसले तसेच सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील, माजी प्राचार्य डॉ.सुभाष शेळके तसेच संस्थेतील आजी-माजी पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने हजर राहून कार्यक्रम यशस्वी केला.



साळुंखे महाविद्यालयात सोमवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे आयोजन

 साळुंखे महाविद्यालयात सोमवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे आयोजन 


कराड/प्रतिनिधी: शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमाले अंतर्गत "शिक्षणातून मूल्यसंस्कार आणि समाजभान" या विषयावर शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक श्री. इंद्रजीत देशमुख यांचे जाहीर व्याख्यान सोमवार, दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे होणार असल्याची माहिती प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.                       
शिक्षण ही मूलभूत गरज आहेच. परंतु आज एका बाजूला विकासाच्या संकल्पनेमागे धावताना  विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव समाजमनावर आहे. तर  दुसऱ्या बाजूला सुशिक्षित समाज, समाजभान हरपत चालला आहे. संस्कारमूल्य विसरत चालला आहे. यातून तयार होणारा संवेदनशून्य समाज संस्कृतीला बाधा आणणारा आहे. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा कुठेतरी मूल्यसंस्कारावर गांभीर्याने चर्चा करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मूल्यसंस्कार व समाजभान जनसामान्यांच्या मनात बीजारोपीत  करण्यासाठी तसेच शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे कार्य व  तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानेच ही  व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित केली आहे.                    

सदर व्याख्यानमालेचे अध्यक्षपद श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे भूषविणार आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सदर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, आजी माजी संस्था पदाधिकारी तसेच कराड नगरीतील सर्व नागरिकांना या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले आहे. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवकवर्ग परिश्रम घेत आहेत. 

फोटो कॅप्शन: प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड




सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी आपले आरोग्य जपावे- प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप

 सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी आपले आरोग्य जपावे- प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप              


कराड/प्रतिनिधी : 
    खरंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिला सक्षमपणे सांभाळत असतात. त्यामुळेच अलीकडे महिलांमध्ये अतिताणामुळे आरोग्याच्या दृष्टीने अधिक तक्रारी येऊ लागल्या आहेत. विशेषत: महिलांमध्ये हिमोग्लोबिन पातळी कमी दिसून येत आहे. त्यामुळे सुदृढ कुटुंबासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्याशिवाय महिलांनी नाती देखील सक्षमपणे सांभाळली पाहिजेत तरच कुटुंबव्यवस्था टिकून राहील. समाजात वृद्धाश्रम राहणार नाहीत असे प्रतिपादन सगाम महाविद्यालय, कराडच्या  प्रा.डॉ.सौ.कोमल कुंदप यांनी केले.            महिला दिनाचे औचित्य साधून बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्या अनिता पोतदार, प्रा.डॉ.सौ उज्वला पाटील, प्रा.अशोक खोत आदी होते.                 
        प्रा.डॉ.कोमल कुंदप पुढे म्हणाल्या, स्त्री आयुष्यात जेव्हा यश मिळवून दाखवते तेव्हा तिचा सर्वप्रथम सन्मान करणारे तिचे वडील असतात. त्यानंतर भाऊ व पती असतो. आज समाजात महिला दिन साजरा करावा लागतोय हेच खरं दुर्दैव आहे. महिलांना रोज कुटुंबात योग्य तो आदर मिळणे ही जबाबदारी खरंतर  पुरुषांची आहे. पुरुषांनी देखील याचे योग्य ते भान ठेवायला हवे. 
        कमला नेहरू अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या अनिता पोतदार म्हणाल्या, निसर्गाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक सहनशीलता दिली आहे. सक्षमता दिली आहे. परंतु समाजात तिला नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. याकरीता स्त्रियांबद्दल असणारी समाजाची नकारात्मक मानसिकता बदलली गेली पाहिजे.                         
        प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, संपूर्ण जगभरातील महिलांबद्दल आदर,अभिमान, सन्मान व्यक्त करण्यासाठी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. खरंतर महिलांचे हक्क त्याचबरोबर त्यांचे शिक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
        याप्रसंगी महिला दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्राध्यापिका यांचा यथोचित गौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. सौ उज्वला पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.सचिन बोलाईकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.कु.दिपाली वाघमारे यांनी केले तर आभार प्रा.सोनाली रांगोळी यांनी मानले. महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी पार पाडला. 

फोटो कॅप्शन: बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.कोमल कुंदप सोबत प्राचार्या अनिता पोतदार, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड आदी मान्यवर.