Thursday, February 9, 2023

'विवेकानंद' शिक्षणसंस्था आणि 'रयत' मुळेच बहुजन मुले शिक्षण प्रवाहात आली- अॅड. उदयसिंह (दादा) पाटील - उंडाळकर.

'विवेकानंद' शिक्षणसंस्था आणि 'रयत' मुळेच बहुजन मुले शिक्षण प्रवाहात आली- अॅड. उदयसिंह (दादा) पाटील - उंडाळकर.                     


कराड /प्रतिनिधी : 
        स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पारतंत्र्यातून मुक्ती मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचे होते. लोकांना शिक्षण दिल्यानेच स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त होईल हे जाणणारी काही जाणकार मंडळी होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात   स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व नंतरच्या काळात देशाची उभारणी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शिक्षणाचा प्रसार काही विभूतींनी केला. त्यात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बहुजन समाजापर्यंत ज्ञानकिरणे पोचवण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था आणि रयत शिक्षणसंस्थेने केले. त्यामुळेच बहुजनांची मुले शिकू शकली असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड.उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर यांनी केले. 
        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिराचे उद्घाटक म्हणून शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सी.ई.ओ कौस्तुभजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा.अभय जायभाये, कराड पंचायत समितीचे  माजी उपसभापती रमेश देशमुख,  महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच मौजे. कोळे गावच्या सरपंच सौ.भाग्यश्री देसाई, प्राचार्य डॉ.अरुण गाडे, प्रा. सुरेश रजपूत आदी. प्रमुख उपस्थितीत होते. 

        अॅड. उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर पुढे म्हणाले, एन.सी.सी आणि एन.एस.एस या दोन योजना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांकडून सकारात्मक आणि रचनात्मक काम करून घेतात. यामधून मिळणारे संस्कार पुढे आयुष्यभर पुरतात. आयुष्याला एक योग्य दिशा देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. 
        उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कौस्तुभजी गावडे म्हणाले, विलासराव (काका) पाटील- उंडाळकर हे विकासाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व होत. कराड दक्षिणेचा जो कायापालट त्यांनी केला त्यामुळेच जनता सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. कायमच जनसेवेला प्राधान्य दिले. विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या संघर्षाच्या काळात देखील काका संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे उंडाळकर कुटुंबीयांचे ऋण शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. आज काका नाहीत पण काकांचा वैचारिक वारसा उदयसिंह (दादा) पाटील मोठ्या समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. 
        शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. अभय जायभाये म्हणाले, आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून संस्कारक्षम, पथदर्शी काम उभं करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेणे आवश्यक वाटते.              
        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, समाजसेवा आणि देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एन.एस.एस च्या माध्यमातून शिबिरार्थी स्वच्छतेचे काम करतात हीच खऱ्या अर्थाने देशसेवा आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. कोळे गावात देखील आमचे विद्यार्थी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मनात जागा निर्माण करतील अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो.               
        यावेळी उपसरपंच सुधीर कांबळे, माजी उपसरपंच संतोष शिंनगारे, श्रीकृष्ण पाटील, करिष्मा संदे, सुषमा देशमुख, माधुरी साळुंखे, कांताबाई पाटील मुख्याध्यापक यादव सर, काटकर सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.सुभाष कांबळे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा.अभिजीत दळवी तर आभार प्रा.अण्णासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुभाष बोलाईकर तसेच प्रा.दिपाली वाघमारे, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा.संभाजी पाटील प्रा.सौ.वंदना पवार, हरीविवेक कुंभार, पंकज कुंभार यांच्यासहित सर्व राष्ट्रीय सेवा योजना सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

फोटो कॅप्शन : 
    मौजे. कोळे, ता. कराड येथे शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना अॅड.उदयसिंह (दादा) पाटील- उंडाळकर सोबत कौस्तुभजी गावडे, प्रा.अभय जायभाये, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सरपंच सौ.भाग्यश्री देसाई आदी. मान्यवर



No comments:

Post a Comment

Thanks for reply