Thursday, February 9, 2023

विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत  घडविण्यासाठी 'विवेकी' विचारांची गरज- प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड                                                   

कराड/प्रतिनिधी : 
        श्री स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित झालेल्या व डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचाराचे बोट धरून चालणाऱ्या श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड हे संस्कार केंद्र मूल्याधिष्ठित संस्काराची व सुंदर कृतीशील विचारांची शिदोरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विवेकानंदांनी जगभरात भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीला एक नवी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. बलशाली युवा भारताचे स्वप्न त्यांनी पाहिले. म्हणूनच विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. आज विवेकानंदांच्या जन्मदिनी विवेकी विचारांचा जागर करूयात आणि सदविवेक बुद्धीने कार्यप्रवण राहू असे प्रतिपादन प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. 

श्री स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त त्यांना अभिवादन करताना डॉ. महेश गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी संत तुकाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक चौगुले सर, कमला नेहरू अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य अनिता पोतदार आणि प्रॅक्टिसिंग स्कूलच्या होगले मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. 
        विवेकानंद जयंती निमित्त कराड शहरातील 'विवेकानंद' शैक्षणिक संकुलाच्या वतीने कराड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथून सकाळ ८.३० वाजता झाली. महाराष्ट्र हायस्कूल, गणपती मंदिर, चावडीत चौक, आझाद चौक मार्गे ही रॅली बापूजी साळुंखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत गेली. तेथे बापूजींना अभिवादन करून ही रॅली प्रभात टॉकीज मार्गे ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन ज्योतिबा मंदिर मार्गे भगवान मुरलीधर मंदिरापर्यंत गेली. तिथून ही रॅली लाहोटी कन्या प्रशाला मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला मानवंदना देऊन चावडी चौक मार्गे पुन्हा महाविद्यालयात परतली.          
        सदर रॅलीत विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड शहरातील सर्व शाखांमधील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते. जय जवान जय किसान, बापूजी साळुंखे यांचा विजय असो, विवेकानंद शिक्षण संस्थेचा विजय असो, अशा विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. ढोल ताशांच्या गजरात चैतन्यपूर्ण उत्साही वातावरणात सदर रॅलीचे सांगता झाली. सदर रॅलीत संत तुकाराम हायस्कूल, कमला नेहरू अध्यापक विद्यालय, प्रॅक्टिसिंग स्कूल, कराड व बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांनी सहभाग नोंदवला.            

फोटो कॅप्शन : 
        विवेकानंद जयंती दिनानिमित्त कराड शहरातून काढलेल्या रॅलीला संबोधित करताना प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड सोबत प्राचार्या अनिता पोद्दार, मुख्याध्यापक चौगुले सर, होगले मॅडम आदी. मान्यवर




No comments:

Post a Comment

Thanks for reply