Thursday, February 9, 2023

हवामान बदलाचा साखर उताऱ्यावर परिणाम: कारखानदारांबरोबर शेतकरी ही अडचणीत- प्रा.डॉ.प्रवीण तळेकर                      


कराड/प्रतिनिधी : 
             पृथ्वीचे वार्षिक सरासरी तापमान नैसर्गिकरीत्या १५ डिग्री सेल्सिअस राखले जाणे आवश्यक आहे. परंतु वाढते शहरीकरण, औद्योगीकरण त्यातून होणारे प्रदूषण हरीतगृह वायूंचे उत्सर्जन यामुळे सरासरीपेक्षा ०.६ अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे.  १९०६ ते २००५ या १०० वर्षाच्या कालावधीत जागतिक सरासरी तापमान ०.७४ सेल्सिअस ने वाढल्याचे दिसून आले आहे. ही वाढ सरासरीपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक आहे असे प्रतिपादन हवामान अभ्यासक व  एस.जी.एम कॉलेजचे प्रा.डॉ.प्रवीण तळेकर यांनी केले. 
        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.सुभाष कांबळे होते.    
            डॉ.प्रवीण तळेकर पुढे म्हणाले, तापमान वाढीमुळे हीमनग वितळणे, सागराच्या पातळीत वाढ होणे, मान्सूनवर परिणाम या घटना दृष्टिक्षेपास येऊ लागल्या  आहेत. समुद्राची पातळी १७ सेंटीमीटरने वाढली असून येत्या काही वर्षात ती ८८ सेंटीमीटर पर्यंत वाढणार आहे. समुद्रसपाटीपासून जमिनीची उंची एक ते दोन मीटर एवढीच असलेले मालदीव बेट अत्यंत धोकादायक स्थितीत आलेले आहे.                                       
        हवामान बदलामुळे २०२० पर्यंत आफ्रिकेतील जवळपास २५ कोटी लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर अलीकडे अवेळी आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम ऊस साखर उताऱ्यावरही होत आहे. गेल्या दोन वर्षात साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याने काही कारखाने उशिरा सुरू होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एकंदरीतच ऊस कारखानदारीवरही हवामान बदलाचा परिणाम प्रत्यक्ष दिसून येत आहे.                 
            कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबल मध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे पण माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत त्या अगोदरच सूर्याचे भ्रमण हा भास आहे हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. भूगोल हा शब्द देखील ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. त्याचबरोबर पाण्याच्या घर्षणातून वीज निर्मिती ही बाब देखील ज्ञानोबारायांनीच सांगून ठेवली होती. 
            याप्रसंगी भूगोल विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच प्रा.सुभाष कांबळे, प्रा.सुरेश काकडे यांनी भूगोल विभागास पाच हजार रुपये कृतज्ञतानिधी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुभाष कांबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सुरेश काकडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार तर आभार प्रा. डॉ. प्रवीण साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Thanks for reply