Monday, November 28, 2022

तरुणांमध्ये संविधानाची मूल्यं रुजविणे हाच संविधान दिनाचा उद्देश - प्रा. अजित पवार (राज्यशास्त्र - २६ नोव्हेँबर)

तरुणांमध्ये संविधानाची मूल्यं रुजविणे हाच संविधान दिनाचा उद्देश - प्रा. अजित पवार

कराड /प्रतिनिधी : 

        भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे एक प्रकारे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. अजित पवार यांनी केले.                                          

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सचिन बोलाईकर,  प्रा. अवधूत टिपूगडे होते.                            

        प्रा. अजित पवार पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेवर इंग्लंड, अमेरिका, फ्रेंच आणि रशियन राज्यघटनांचा प्रभाव पडलेला आहे. वेगवेगळ्या विचारसरणी आपल्या राज्यघटनेत आल्यामुळे भारतीय राज्यघटना सर्वसमावेशक झाली आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार सरकारला असला तरी मूळ चौकट बदलण्याचा अधिकार सरकारला नाही. असेही प्रा. अजित पवार म्हणाले.                                 

         कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील ६० देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केले आहे. असे असले तरी संविधानाचा आत्मा मात्र भारताच्या मातीतलाच आहे. भारतीय संविधानाने विविध जाती धर्मांना सलोख्याच्या धाग्याने गुंफले आहे. त्यामुळेच भारतीय लोकशाही अभेद्य आहे. या संविधानाने जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे हे देखील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तेव्हा कर्तव्य पालनाचे भान आपण ठेवूया. 

        याप्रसंगी संविधानाने दिलेले 'मूलभूत कर्तव्य' या विषयावरील  भित्तीपत्रिकेचे उद्घाटन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रा. राजेंद्र भिसे यांनी यावेळी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोरख गायकवाड तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. महेश लोहार यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. युवराज कापसे तर आभार डॉ. ज्योती कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                                               

फोटो कॅप्शन : 

        संविधान दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. अजित पवार सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. अवधूत टिपूगडे, प्रा. राजेंद्र भिसे आदी.















Friday, November 25, 2022

बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शुभम जाधव याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या शुभम जाधव याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

कराड/ प्रतिनिधी: 

        श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम रामचंद्र जाधव बी.ए भाग २ याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ऋषिकेश साखरे बी.ए भाग ३ या विद्यार्थ्याने देखील  गोळाफ़ेक  या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

        शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सदर आंतरविभागीय स्पर्धा राजे रामराव महाविद्यालय, जत जिल्हा सांगली येथे ७ ते ९ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. यापैकी शुभम जाधव याची निवड पुन्हा ३ डिसेंबर २०२२ पासून औरंगाबाद येथे होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी झाली आहे.  अश्वमेध स्पर्धेसाठी भालाफेक या क्रीडा प्रकारात त्याची शिवाजी विद्यापीठ संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.                                        

        शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. गौरव पाटील यांनी या खेळाडूस मार्गदर्शन केले. बापूजी साळुंखे महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा तसेच प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो अशा भावना सदर खेळाडूंनी व्यक्त केल्या. या दोन्ही खेळाडूंचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन सेवक, विद्यार्थी वर्गाकडून  अभिनंदन होत आहे.





Monday, November 21, 2022

बदलत्या परिस्थितीत पदवी बरोबरच विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे आवश्यक - प्रा. डॉ. भरत पाटील

बदलत्या परिस्थितीत पदवी बरोबरच विद्यार्थ्यांकडे कौशल्य असणे आवश्यक - प्रा. डॉ. भरत पाटील                         

कराड/ प्रतिनिधी : 

         जागतिकीकरणामुळे औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी वाणि ज्य व व्यवस्थापन शाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत मात्र बदलत्या परिस्थितीत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पदवी बरोबरच सचोटीने व कौशल्यपूर्णतेने काम करण्याची क्षमता असली पाहिजे असे प्रतिपादन कन्या महाविद्यालय कडेगाव येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. भरत पाटील यांनी केले.

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित 'वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी' या विषयावर ते प्रमुख साधनव्यक्ती म्हणून बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रा. जी.आर. वास्के हे प्रमुख उपस्थितीत होते.              

        याप्रसंगी प्रा. जी. आर. वास्के म्हणाले, कॉमर्स विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट या करिअर व्यतिरिक्त मार्केटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, एच आर, अकाउंट्स, ऑडिट, बिझनेस टॅक्सेशन, कम्युनिकेशन, कॉस्टिंग या सर्व बाबींकडे प्राधान्याने पाहणे गरजेचे आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे बदलत्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी एक संधी म्हणून पहावे. शासन देखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असे धोरण राबवत आहे.                   

        सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर तर पाहुण्यांची ओळख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. तबस्सुम आत्तार व आभार डॉ. रणजीत लिधडे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. अशोक खोत, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. महेश लोहार, प्रा. कापसे आदींनी प्रयत्न केले.           

फोटो कॅप्शन : 

            कॉमर्स शाखेतील करिअरच्या संधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. भरत पाटील, प्रा. जी.आर. वास्के सोबत प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर आदी. मान्यवर