Monday, November 28, 2022

तरुणांमध्ये संविधानाची मूल्यं रुजविणे हाच संविधान दिनाचा उद्देश - प्रा. अजित पवार (राज्यशास्त्र - २६ नोव्हेँबर)

तरुणांमध्ये संविधानाची मूल्यं रुजविणे हाच संविधान दिनाचा उद्देश - प्रा. अजित पवार

कराड /प्रतिनिधी : 

        भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजविणे हा संविधान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे एक प्रकारे बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. अजित पवार यांनी केले.                                          

        बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सचिन बोलाईकर,  प्रा. अवधूत टिपूगडे होते.                            

        प्रा. अजित पवार पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेवर इंग्लंड, अमेरिका, फ्रेंच आणि रशियन राज्यघटनांचा प्रभाव पडलेला आहे. वेगवेगळ्या विचारसरणी आपल्या राज्यघटनेत आल्यामुळे भारतीय राज्यघटना सर्वसमावेशक झाली आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार सरकारला असला तरी मूळ चौकट बदलण्याचा अधिकार सरकारला नाही. असेही प्रा. अजित पवार म्हणाले.                                 

         कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील ६० देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केले आहे. असे असले तरी संविधानाचा आत्मा मात्र भारताच्या मातीतलाच आहे. भारतीय संविधानाने विविध जाती धर्मांना सलोख्याच्या धाग्याने गुंफले आहे. त्यामुळेच भारतीय लोकशाही अभेद्य आहे. या संविधानाने जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्यांचे पालन करणे हे देखील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तेव्हा कर्तव्य पालनाचे भान आपण ठेवूया. 

        याप्रसंगी संविधानाने दिलेले 'मूलभूत कर्तव्य' या विषयावरील  भित्तीपत्रिकेचे उद्घाटन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रा. राजेंद्र भिसे यांनी यावेळी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गोरख गायकवाड तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. महेश लोहार यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. युवराज कापसे तर आभार डॉ. ज्योती कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                                               

फोटो कॅप्शन : 

        संविधान दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. अजित पवार सोबत प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. अवधूत टिपूगडे, प्रा. राजेंद्र भिसे आदी.















No comments:

Post a Comment

Thanks for reply