Sunday, September 25, 2022

कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रती विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान असावे - प्रा. एन. व्ही. शिंदे (राष्ट्रीय सेवा योजना विभाग २४/०९/२०२२)

कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रती विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान असावे -  प्रा. एन. व्ही. शिंदे                                                                          

 कराड/प्रतिनिधी: 

        तरुण पिढीत प्रचंड ऊर्जा आहे. त्यामुळे तरुणांना राष्ट्रीय सेवा योजनेत प्राधान्याने सहभागी करून घेतले पाहिजे. श्रमदानाच्या माध्यमातून त्यांच्यात सेवेचा संस्कार रुजवला पाहिजे. कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रती असणाऱ्या जबाबदारीचे भान त्यांना दिले गेले पाहिजे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार विजेते प्रा. एन.व्ही.शिंदे यांनी केले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ महेश गायकवाड होते.   

        प्रा.एन.व्ही.शिंदे पुढे म्हणाले, पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी खरं तर शिवाजी विद्यापीठाने आता पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वृक्ष लागवड सक्तीची करणे गरजेचे आहे. तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाप्रती देखील तरुणांनी सतर्क असले पाहिजे असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. महेश गायकवाड म्हणाले, इतरांसाठी स्वयंस्फूर्त भावनेने पुढे केलेला मदतीचा हातच खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळवून देतो. भरभरून आनंद देतो. सेवेच्या माध्यमातूनच मनुष्याला देवत्वाची अनुभूती मिळते. म्हणून स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी देखील जगा. समाजाशी असणारी सेवेचे नाळ तुटू देऊ नका. हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहे असे डॉ. गायकवाड म्हणाले.                      

        याप्रसंगी प्रा.एन.व्ही.शिंदे यांनी एन.एस.एस मध्ये वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका यासाठी कै. प्रदीप शिंदे फिरता भव्य स्मृती चषक तसेच रोख २५ हजार रुपये प्राचार्य डॉ. गायकवाड यांचेकडे सुपूर्द केले. रकमेच्या येणाऱ्या व्याजातून सदर दोन स्वयंसेवकांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या दोन्ही कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपले सर्व मानधन एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांना देण्याचे जाहीर केले. तसेच प्रत्येकी पाच हजारांची देणगी जाहीर केली.         

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. सचिन बोलाईकर यांनी तर आभार प्रा. संभाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा.विश्वनाथ सुतार, प्रा.ए.यू.पाटील तसेच एन.एस.एस चे सर्व सदस्य, विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.  

             

फोटो कॅप्शन : राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य पुरस्कार विजेते प्रा. एन. व्ही. शिंदे,  प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड सोबत कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे, प्रा. अण्णा पाटील
















6 comments:

Thanks for reply