कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 19 महाराष्ट्र बटालियन कराड एनसीसी विभाग यांचे वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -आयुष्यमान भारत याविषयीचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अशोक यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे- आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी होय. भारत सरकारने निर्माण केलेल्या या योजनेत कोट्यावधी लोक सहभागी आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना या योजनेने रुपये पाच लाखापर्यंत चे अनुदान नागरिकांच्या साठी दिलेले आहे. आज आरोग्याचा प्रश्नांचा विचार केला तर गोरगरीब माणसांना आर्थिक परिस्थिती अभावी दवाखान्याचा खर्च परवडत नाही. पैशाअभावी अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. परंतु या योजनेत सहभागी झाल्यामुळे रुपये पाच लाखापर्यंत चा मोठा खर्च शासन करते. त्यामुळे पात्र असलेल्या नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आपले आरोग्य जपले पाहिजे. आज एनसीसी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे समाजात जे लोक या योजनेपासून वंचित आहेत या सर्वांना एनसीसीतील विद्यार्थ्यांनी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रमुख पाहुण्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एनसीसीतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या अवतीभवती समाजातील अशिक्षित, पीडित, वंचित नागरिकांसाठी या योजनेचे साक्षरता अभियान राबवून लोकांना या योजने संबंधीची सर्व माहिती द्यावी. त्यामुळे आपल्या सर्वांच्या हातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य घडेल. अशी मी अशा व्यक्त करतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय एनसीसी विभागप्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, एनसीसी कॅडेट, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता येवले यांनी केले तर आभार प्रा. रत्नाकर कोळी यांनी व्यक्त केले.
Comments
Comments