Wednesday, January 4, 2023

स्त्री जगताची 'आई' आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे. - सुरेखा शेजवळ (कराड मधील साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार)

स्त्री जगताची 'आई' आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे. - सुरेखा शेजवळ (कराड मधील साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार)                

कराड/प्रतिनिधी: 

        अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे अज्ञानाला दूर करण्यासाठी, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, जातीभेद यासारखे प्रश्न पारतंत्र्याच्या काळात २०० वर्षांपूर्वी एखाद्या स्त्रीने घेऊन प्रस्थापित व्यवस्थेला शह देणे तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण सावित्रीबाईंनी ते करून दाखवलं. त्यामुळे आजची  स्त्री जोखडातून मुक्त झाली. म्हणूनच आज दोन शतकानंतरही सावित्रीबाई प्रत्येक स्त्रीचा हळवा कोपरा आहे. सावित्री प्रत्येक स्त्री चे दैवत आहे. सावित्री स्त्री जगताची 'आई' आहे आणि मनुष्य जन्माचा सन्मान आहे असे भावनिक प्रतिपादन आदर्श शिक्षिका सुरेखा राजेंद्र शेजवळ यांनी केले.                 

         बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित सावित्रीच्या लेकींचा सत्कार समारंभ प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत माजी मुख्याध्यापिका शुभदा नारायण गायकवाड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. सुरेखा शेजवळ पुढे म्हणाल्या, आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांचे कार्य व विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा हा समस्त स्त्री जातीच्या स्वातंत्र्यासाठी दिला होता. हे मनोमन स्मरण करणे गरजेचे आहे. विशेषतः महाविद्यालयीन युवतींनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

            शुभदा गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाल्या, मळलेल्या वाटेने न जाता, सर्वसामान्य जीवन न जगता समस्त बहुजन समाजाच्या निरक्षरतेच्या बेड्या तोडण्याचे काम फुले दांपत्याने केले. पुढे हाच वसा बापूजींनी जपला व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साक्षरतेचे काम पुढे चालू ठेवले. आज त्याच सावित्रीच्या व बापूजींच्या पुण्याईवर आम्ही उभे आहोत हे सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या कार्याची परिपूर्ती सावित्रीबाईं मुळेच होऊ शकली. सावित्री ज्योतिबांच्या कार्याची खरी प्रेरणा व ऊर्जा होत्या. आज समाजात सावित्रीबाईंच्या कामाचा लहानसा का होईना वाटा उचलणाऱ्या सावित्रीच्या लेकी आहेत. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज अशा लेकींचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.  धनश्री कुलकर्णी, धनश्री पाटील, रेखा सूर्यवंशी, रूपाली जाधव, ऐश्वर्या पाटणकर व प्रियांका यादव या सावित्रींचा वसा जपणाऱ्या लेकींचा  शुभदा गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सुरेश यादव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.यू.आर.पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.शोभा लोहार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.टी.एम.आतार यांनी केले तर आभार सौ. एस.पी.काळे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन: 

सावित्रीच्या लेकींचा सत्कार करताना, मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सुरेखा राजेंद्र  शेजवळ, शुभदा नारायण गायकवाड, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आदी मान्यवर.









https://www.facebook.com/100085440955380/videos/1237913230136335/?mibextid=Nif5oz







No comments:

Post a Comment

Thanks for reply