इंडियन आर्मी जगातील सर्वोत्तम आर्मी आहे. - कर्नल जे. पी. सत्तिगिरी
कराड/प्रतिनिधी :
छात्रसेनेत (एनसीसी) विविध मूल्याधिष्ठित संस्कार छात्रसैनिकांमध्ये रुजविले जातात. विशेषत: शिस्त व देशप्रेमाचे धडे छात्रसैनिकांना त्यातून मिळत असतात. दरवर्षी देशभरातून अकरा लाख मुले एनसीसी मध्ये प्रवेशित होत असतात. त्यातूनच पुढे निवडक छात्रसैनिक पात्रता निकषाच्या आधारावर विविध पदांवर देशसेवेसाठी रुजू होत असतात. एकप्रकारे एनसीसी मधून सेवेत रुजू होणाऱ्या सुसंस्कारीत जवानांमुळेच इंडियन आर्मी आज जगातील सर्वोत्तम आर्मी बनली आहे असे प्रतिपादन १९ महाराष्ट्र बटालियन कराडचे कमांडींग ऑफिसर कर्नल जे.पी. सत्तिगिरी यांनी केले. बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे राष्ट्रीय छात्रसेना उद्घाटन समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रमुख उपस्थितीत अॅडम ऑफिसर कर्नल दिनेश कुमार झा होते.
कर्नल सत्तिगिरी पुढे म्हणाले, देश वेगाने महासत्ता बनण्याच्या दिशेने चालला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारा मावळा म्हणूनच तुम्हाला देशसेवेत रुजू व्हायचे आहे. त्या दृष्टिकोनातून तयारीला लागा असेही ते म्हणाले.
कर्नल दिनेश कुमार झा म्हणाले, बापूजी साळुंखे यांनी खूप प्रयासाने ही शिक्षण संकुले उभे केली आहेत. त्यांच्या संघर्षाची जाण ठेवा आणि शिक्षणावरच लक्ष केंद्रित करा. विशेषतः एनसीसी च्या माध्यमातून शिस्तीचे पालन करा. आयुष्यभर शिस्त तुम्हाला सुखकर जीवन जगायला मदत करेल. खऱ्या अर्थाने सुदृढ समाज बांधणीमध्ये एनसीसीचे महत्त्व अधोरेखीत होते ही बाब जाणून घ्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले एनसीसी खऱ्या अर्थाने छात्रसैनिकांमध्ये देश प्रेमाचे स्फूल्लिंग चेतवते. छात्रसैनिकाला सैनिकी पेशापर्यंत घेऊन जाणारा एनसीसी हा एक महत्त्वाचा दुवा आहे. छात्रसैनिक कालावधीनंतर छात्रसैनिकाची वर्दी, कॅप जरी उतरली तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनात कायम वर्दी राहते, देशप्रेम राहते, शिस्त राहते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एनसीसी तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या शिस्त व सेवेचा संस्कार सांगणाऱ्या प्रतीकात्मक फलकांचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवकालीन शस्त्रास्त्रे व विविध शिवकालीन वस्तूंचे देखील प्रदर्शन भरवण्यात आले होते. एनसीसी उद्घाटन समारंभास वेणूताई चव्हाण महाविद्यालय, संत गाडगेबाबा महाविद्यालय, कृष्णा महाविद्यालय रेठरे तसेच आहेर इंजीनियरिंग कॉलेजचे छात्र सैनिक मोठ्या संख्येने हजर होते. त्याचबरोबर सुभेदार संजय कुमार, एनसीसी ऑफिसर प्रा. गावडे, प्रा. देसाई, प्रा.माळी, प्रा. ठाकरे, प्रा. अवसरे, प्रा. ऐश्वर्या मॅडम आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर तर पाहुण्यांच्या परिचय प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी तर आभार प्रा. विक्रांत सुपुगडे यांनी मानले.
फोटो कॅप्शन :
एन.सी.सी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना कर्नल जे.पी. सत्तिगिरी, कर्नल दिनेश कुमार झा, प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, मा. मानसिंगराव कुमठेकर, प्रा. सचिन बोलाईकर
No comments:
Post a Comment
Thanks for reply