Tuesday, December 13, 2022

पहिल्या महायुद्धात कराड परिसरातील सैनिक सहभागी, जुने दस्तऐवज सापडले! - इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर

पहिल्या महायुद्धात कराड परिसरातील सैनिक सहभागी, जुने दस्तऐवज सापडले! - इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर                     

कराड /प्रतिनिधी : 

        कराड आणि परिसराला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात या परिसरातील तीनशे पेक्षा अधिक सैनिक सहभागी होते अशाप्रकारचे दस्तावेज नुकतेच सापडले आहेत. त्यामुळे कराड परिसरातील सैनिकांचा महायुद्धातील समावेश व त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणे आता शक्य झाले आहे. याशिवाय साळुंखे महाविद्यालयाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे आता आम्हाला स्थानिक इतिहासाचा अभ्यास करणे सहज सुलभ होईल. आमच्या अभ्यासाला गती येईल. सर्वंकष अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. त्याद्वारे कराडच्या ऐतिहासिक वैभवला नक्कीच उजाळा मिळणार आहे असे प्रतिपादन मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी केले.                                        

       बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन व मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्याशी सामंजस्य करार प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. तर प्रदर्शनाचे उद्घाटक कर्नल जे. पी. सत्तिगिरी, कर्नल दिनेश कुमार झा, प्रा. डॉ. सदाशिव पाटील व  प्रा. सचिन बोलाईकर आदी. होते.                              

        प्रदर्शनाचे उद्घाटक कर्नल जे. पी. सत्तिगिरी म्हणाले, इतिहासातून शिकण्याचा  प्रयत्न करा. इतिहासातील आदर्श प्रतिमांचे विचार अंगिकारण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला प्रेरणा, ऊर्जा मिळेल. मात्र इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासातील चुका विसरु नका कारण त्या विसरला तर परत त्याच चुका होण्याची शक्यता असते. त्याबाबतीत सतर्क रहा.                     

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना   वरून बोलताना प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले, महाराष्ट्राला मोठा प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा कृष्णा कोयना संगमावर असलेल्या डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात देखील आहेत. विशेषत: भुईकोट किल्ल्यात असणारी नकट्या रावळाची  विहीर,  त्याचबरोबर २००० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन सापडलेल जातं,  विष्णू, कुबेर, शनीच्या मुर्त्या, तसेच जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. ते यथायोग्य जतन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.                       

       सदर प्रदर्शनात आद्यपूराश्मयुग, मोहेंजोदारो, हडप्पा, रावी, मध्यपुराश्मयुग तसेच सिंधू संस्कृतीचे पोस्टरच्या माध्यमातून तपशीलवार विवचन दिसून आले. याशिवाय इतिहासकालीन दिनदर्शिका, शिवकाली नाणी, जुनी चलने, शिवरायांची राजचिन्हे, मोडीतील विविध पत्रे तसेच मराठा कालीन विविध तलवारी, दुधार, युद्धफरशी, युद्धपट्टा, कट्यार, भाला, शिंगीभाला, जांबीया, फरशी आदी. शस्त्रास्त्रे सदर प्रदर्शनात शौर्याची साक्ष देत होती. त्यामुळे प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.          याप्रसंगी महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर भितीपत्रिकेचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक चौगुले सर, प्रा. ए. बी. कणसे, अॅड. राम होगले यांच्यासहित विविध मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन बोलाईकर, तर पाहुण्यांचा परिचय प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शोभा लोहार यांनी तर आभार प्रा. विक्रांत सुपूगडे यांनी मानले. सदर प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. युवराज कापसे, नारायण नाईक यांच्यासहित सर्व प्राध्यापक, सेवकवृंद, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.                  

फोटो कॅप्शन : 

    सामंजस्य करार प्रसंगी मार्गदर्शन करताना मानसिंगराव कुमठेकर सोबत कर्नल जे. पी. सत्तिगिरी, प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. सचिन बोलाईकर.




No comments:

Post a Comment

Thanks for reply