Friday, December 2, 2022

कराड तालुका शालेय कबड्डी स्पर्धा : शिवनगर आणि एस.जी.एम ची बाजी

कराड तालुका शालेय कबड्डी स्पर्धा : शिवनगर आणि एस.जी.एम ची बाजी                  

कराड/प्रतिनिधी: 

        यश आणि अपयश याशिवाय खेळ पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे यश मिळाले तरी नम्र रहा आणि अपयश मिळाले तरी खचू नका. खेळाच्या माध्यमातून शरीर आणि मन सुदृढ ठेवा त्याचा फायदा पुढे आयुष्य जगताना नक्कीच होईल. अपयशात कोणाचा द्वेष, मत्सर करू नका तर अधिक जोमाने पुढील तयारीला लागा. फक्त खेळ जिंकला पाहिजे. खिलाडूवृत्ती जिंकली पाहिजे ही भावना मनात ठेवा असे प्रतिपादन प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी केले.                             

      कराड तालुका शालेय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. सुरेश रजपूत, प्रा. सुरेश यादव, प्रा. महेश लोहार आदी होते.

     कराड तालुका शालेय शासकीय १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धा नुकत्याच विंग हायस्कूल येथे संपन्न झाल्या. तर स्पर्धेतील अंतिम सामना एस.जी.एम कॉलेज, कराड  च्या क्रीडांगणावर पार पडला. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात कृष्णा महाविद्यालय शिवनगर ता. कराड मुलांच्या संघाने ७ गुणांनी एस.जी.एम कॉलेज, कराड वर मात करत विजयी जल्लोष केला. तर एस.जी.एम कॉलेजच्या मुलींच्या संघाने वाय.सी. कॉलेज, कराड च्या संघाला २५ गुणांनी धोबीपछाड दिली. या स्पर्धेसाठी मुलांचे ११ संघ तर मुलींचे ६ संघ सहभागी झाले होते. विजेते संघ छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथे ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सातारा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून आयुब कच्छी, अभिषेक पाटील, सचिन चव्हाण, अजीम इनामदार, दिग्विजय पाटील, विद्या पाटील आदींनी काम पाहिले. तर प्रा. गौरव पाटील, प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. विक्रांत सुपगडे यांनी सर्वतोपरी नियोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडल्या.                      

    यावर्षी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड कडे यजमानपद होते. साळुंखे महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध नियोजनाबाबत प्राचार्य डॉ. मोहन राजमाने सरांनी यजमान महाविद्यालयाचे अभिनंदन केले.              

फोटो कॅप्शन : 

    कृष्णा महाविद्यालय शिवनगर ता. कराड मुलांचा विजयी संघ प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांच्याकडून चषक स्वीकारताना.












 


No comments:

Post a Comment

Thanks for reply