Wednesday, November 2, 2022

राष्ट्रीय एकता दौड शासनाचा प्रभावी उपक्रम - प्राचार्य डॉ. महेश गायकवाड

राष्ट्रीय एकता दौड शासनाचा प्रभावी उपक्रम 

- प्राचार्य डॉ. महेश गायकवाड                                            

कराड/ प्रतिनिधी: 

            सरदार वल्लभभाई पटेल यांचे  स्वातंत्र्य चळवळीतील तसेच  देशाची एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने राष्ट्रीय एकता दौड चे देखील आयोजन केले जाते. परस्पर सलोखा आणि एकात्मतेच्या दृष्टिकोनातून हा शासनाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद  असल्याचे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले.                                       

            बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.                            

            प्राचार्य डॉ. महेश गायकवाड पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर खाजगी संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणण्यात वल्लभभाई पटेल यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळेच एकसंघ भारताची निर्मिती होऊ शकली. या आयोजनामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि आजादी का अमृत महोत्सवाची भावना देशभर पोहोचण्यास मदत होईल.           

            राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने सामूहिक स्वरूपात राष्ट्रीय एकता दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली तर त्याचबरोबर एकता दौडचेही आयोजन करण्यात आले होते. प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रा. अभिजीत दळवी, डॉ. शीतल  गायकवाड, प्रा. स्नेहल वरेकर, प्रा. दिपाली वाघमारे यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.                             

फोटो कॅप्शन : 

        राष्ट्रीय एकता दौडच्या निमित्ताने उपस्थित प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी.







No comments:

Post a Comment

Thanks for reply