महिलांनी
स्वतःचे आरोग्य जपणे हीच यशस्वी संसाराची गुरुकिल्ली
_____ डॉ. संचिता यादव.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे महिला सक्षमीकरण आणि लिंग
समानता आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती यांचे संयुक्त विद्यमाने घेतलेल्या उजळणी
वर्गात "महिलांचे आरोग्य आणि पीसीओडी जनजागृती" या विषयावरती माऊली
हॉस्पिटल कराड येथील डॉ. संचिता यादव यांचे व्याख्यान संपन्न झाले. आपल्या
मार्गदर्शनात त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे हिच यशस्वी संसाराच्या
यशाची गुरुकिल्ली आहे! आजच्या काळात मुली व महिला यामध्ये पीसीओडी चे प्रमाण
वाढले आहे. त्याची कारणे काय आहेत व त्यावर ती उपचार काय घेतले पाहिजेत याबद्दल
महिला जागृती हवी. यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. दररोजचा व्यायाम
महिलांनी करावा. पीसीओडी मुळे वजन वाढणे, केस गळणे, चेहऱ्यावरती मुरूम येणे, गोड खावेसे वाटणे, काखेत, गळ्याला चट्टे पडणे, असा प्रादुर्भाव होतो. यासाठी संतुलित जीवनशैली जगता
आली पाहिजे. शरीराला चुकीच्या सवयी लागल्या की शारीरिक बिघाड होऊन आत्मविश्वास
निघून जातो. योग्य सल्ला न घेतल्यास किरकोळ आजार देखील मोठ्या आजारात रुपांतरीत
होतो. आपले आरोग्य जरी चांगले असले तरी ते निरंतर जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे
प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, खऱ्या अर्थाने प्रपंचाचा गाडा हाकण्यास पुरुष व
स्त्री ही दोन चाके आहेत. यातील एक चाक जरी नादुरुस्त झाले तर तो गाडा पुढे जाणार
नाही. यासाठी महिलांनी आपले आरोग्य सुरक्षित ठेवले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या माजी
विद्यार्थिनी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशक सौ.धनश्री पाटील
उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ. सोनाली रांगोळे यांनी
केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ प्राध्यापक सचिन बोलाईकर यांनी केला. सूत्रसंचालन
प्रा.शैला चोबे यांनी केले तर आभार डॉ.साऱीका लाटवडे यांनी व्यक्त केले. या
कार्यक्रमासाठी जुनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत उपस्थित होते. तसेच
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक,प्राध्यापिका बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Thanks for reply