Friday, October 14, 2022

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी सुखद भावना जपा. - प्रा. शिवराम मेस्त्री (मानसशास्त्र विभाग)

सुदृढ मानसिक आरोग्यासाठी सुखद भावना जपा. 

             - प्रा. शिवराम मेस्त्री 

कराड/प्रतिनिधी :

            मानसिक आरोग्य ही खूप मौल्यवान संपत्ती आहे. ही संपत्ती आपल्याला जपता आली पाहिजे, कारण मानसिक आरोग्याचा परिणाम हा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबावर व पर्यायाने समाजावर होत असतो. आपली विचारसरणी योग्य असेल तर मानसिक आरोग्य सुदृढ राहते. त्यामुळे सुखद भावना जपा व दुखद भावनांकडे दुर्लक्ष करा. एकंदरीतच मानसिक आरोग्य ही राष्ट्रीय संपत्ती आहे असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा चे माजी मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवराम मेस्त्री यांनी केले.                       

            बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे मानसशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य. डॉ. महेश गायकवाड होते. प्रमुख उपस्थितीत प्रा. सोमनाथ पाटील होते.                            

            प्रा. मेस्त्री पुढे म्हणाले, जगभरातील वाढत्या आजारांमध्ये मानसिक आरोग्य हा गंभीर विषय बनत चालला आहे. मानवी भावनांची तीव्रता, नकारात्मक भावनांचा वेग आणि भावनांच्या समायोजनाचा अभाव याचा परिणाम मानवाच्या वर्तनावर होत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य दिन जगभरात जाणीव जागृती साठी साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य. डॉ. महेश गायकवाड म्हणाले, खरंतर दुःख, वेदना, ताण नसणारी व्यक्ती जगात शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला ताण आहेच परंतु त्यावर नियंत्रण मिळवले गेले पाहिजे. तणावातून शक्य तेवढे मुक्त राहिले पाहिजे. त्यासाठी स्वतःशी बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. स्वतःचे मानसिक आरोग्य आपण स्वतः सांभाळले तर इतरांचेही आरोग्य आपण अप्रत्यक्षरीत्या सांभाळत असतो हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.              

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सोमनाथ पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दयानंद कराळे तर सूत्रसंचालन प्रा. कु. माधुरी वेताळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कु. सविता येवले यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.            

फोटो कॅप्शन: 

    मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना प्रा. शिवराम मेस्त्री सोबत प्र. प्राचार्य. डॉ महेश गायकवाड, प्रा. सोमनाथ पाटील



















1 comment:

Thanks for reply