Friday, October 14, 2022

मोबाईलच्या वापराने तरुण पिढीचे जगणे एकाकी कोषात... - प्राचार्य. डॉ. एल. जी. जाधव

मोबाईलच्या वापराने तरुण पिढीचे जगणे एकाकी कोषात...

              - प्राचार्य. डॉ. एल. जी. जाधव     

कराड/ प्रतिनिधी:

        प्रचंड वाढती स्पर्धा व मोबाईल मूळे आलेले एकाकी पण तरुण पिढीला नैराश्यग्रस्त करीत आहे. मोबाईलच्या अतिरेकी वापराने ही पिढी एकाकी होऊन घरात, समाजात व्यक्त व्हायला कुठेतरी कमी पडत आहे. यातून भविष्यात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतील. म्हणून वेळीच यातून मार्ग काढायचा असेल तर तरुणांच्या हाती उत्तम साहित्याने ओथंबलेली पुस्तके दिली पाहिजेत. उत्तम साहित्यच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड चे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव यांनी केले.                   

        बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे भाषा विभागांच्या वतीने वाड्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. डॉ. जाधव पुढे म्हणाले, मनमुराद आनंदी जगण्यासाठी साहित्य मदत करते. त्यामुळे पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. साहित्य हे माणूस घडवण्याचे काम करत असते. त्यातून पिढीने शिकले पाहिजे. तरुणांना काव्य करता आले पाहिजे, काव्य जगता आले पाहिजे. तरच संवेदना जिवंत राहतील असेही ते याप्रसंगी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, शब्द तेच असतात फक्त त्यांना योग्य जागी बसवता आले, त्यांच्यात जीव ओतता आला तर अप्रतिम साहित्य निर्मिती होते. शब्दांच्या पावसात भिजलात तरच नवीन शब्दांचे अंकुर फुटतील, नवीन साहित्य निर्मिती होऊ शकेल.           

            प्रा. डॉ. सौ. उज्वला पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. रत्नाकर कोळी, सूत्रसंचालन प्रा.सौ सीमा येवले तर आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.                            

फोटो कॅप्शन : 

    भाषा विभागांच्या वतीने वाड्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एल.जी जाधव सोबत प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड








1 comment:

Thanks for reply