Tuesday, September 20, 2022

भारतातील समाजमन बांधणीचे काम हिंदी भाषा करते - डॉ. भरत सगरे

भारतातील समाजमन बांधणीचे काम हिंदी भाषा करते 
- डॉ. भरत सगरे

कराड (प्रतिनिधी) : भाषावार प्रांतरचनेच्या खंडप्राय भारत देशात 1822 मातृभाषा तर 524 प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. आज अखेर समाजाला बळकटी देण्याचे काम या भाषांनी चोखपणे बजावले आहे. प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे माधुर्य आहे, सौंदर्य आहे. प्रत्येक भाषा श्रेष्ठ आहे. असे असले तरी या सर्व भाषांना स्वातंत्र्य संग्रामात एकत्र बांधण्याचे काम हिंदी भाषेने केले आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन हिंदी साहित्याचे अभ्यासक व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. भरत सगरे यांनी केले.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते.

डॉ. सगरे पुढे म्हणाले, भाषा विचारांची अभिव्यक्ती आहे, मनातील विचार प्रभावी मांडण्यासाठी शिक्षण देखील मातृभाषेतून घेतले पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज बाहेर संस्कृती व भाषांचा पगडा येथील जनमानसावर पडत आहे. परकीय भाषांच्या प्रेमापोटी आपल्या काही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले डॉ. महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात सकारात्मक बदल दिसून येत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, हिंदी ही अध्यात्म, काव्य, प्रेम व संगीताची भाषा आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा योग्य तो सन्मान राखूया. तसेच केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये हिंदी अपेक्षित असते. तेव्हा हिंदी भाषेतून बोलूया.

याप्रसंगी सरल हिंदी कक्षा पाठ्यक्रम यशस्वी पूर्ण केलेल्या प्रा. कु. शितल सालवाडगी कु. मोमीन सोफिया,  कु. अश्विनी सावंत, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. सचिन बोलाईकर, अथर्व सुतार,  मुमताज बेग, सफिना सय्यद, ऐश्वर्या पाटणकर आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रा. रत्नाकर कोळी प्रा. सुभाष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. ए. यू. पाटील तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड प्रा. सविता येवले यांनी केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी आभार मानले.









 

1 comment:

Thanks for reply