Sunday, September 25, 2022

कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रती विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान असावे - प्रा. एन. व्ही. शिंदे (राष्ट्रीय सेवा योजना विभाग २४/०९/२०२२)

कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रती विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान असावे -  प्रा. एन. व्ही. शिंदे                                                                          

 कराड/प्रतिनिधी: 

        तरुण पिढीत प्रचंड ऊर्जा आहे. त्यामुळे तरुणांना राष्ट्रीय सेवा योजनेत प्राधान्याने सहभागी करून घेतले पाहिजे. श्रमदानाच्या माध्यमातून त्यांच्यात सेवेचा संस्कार रुजवला पाहिजे. कुटुंब, समाज आणि निसर्गाप्रती असणाऱ्या जबाबदारीचे भान त्यांना दिले गेले पाहिजे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार विजेते प्रा. एन.व्ही.शिंदे यांनी केले. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ महेश गायकवाड होते.   

        प्रा.एन.व्ही.शिंदे पुढे म्हणाले, पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी खरं तर शिवाजी विद्यापीठाने आता पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वृक्ष लागवड सक्तीची करणे गरजेचे आहे. तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाप्रती देखील तरुणांनी सतर्क असले पाहिजे असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. महेश गायकवाड म्हणाले, इतरांसाठी स्वयंस्फूर्त भावनेने पुढे केलेला मदतीचा हातच खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळवून देतो. भरभरून आनंद देतो. सेवेच्या माध्यमातूनच मनुष्याला देवत्वाची अनुभूती मिळते. म्हणून स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी देखील जगा. समाजाशी असणारी सेवेचे नाळ तुटू देऊ नका. हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहे असे डॉ. गायकवाड म्हणाले.                      

        याप्रसंगी प्रा.एन.व्ही.शिंदे यांनी एन.एस.एस मध्ये वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका यासाठी कै. प्रदीप शिंदे फिरता भव्य स्मृती चषक तसेच रोख २५ हजार रुपये प्राचार्य डॉ. गायकवाड यांचेकडे सुपूर्द केले. रकमेच्या येणाऱ्या व्याजातून सदर दोन स्वयंसेवकांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. याप्रसंगी महाविद्यालयाच्या दोन्ही कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपले सर्व मानधन एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांना देण्याचे जाहीर केले. तसेच प्रत्येकी पाच हजारांची देणगी जाहीर केली.         

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. सचिन बोलाईकर यांनी तर आभार प्रा. संभाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी प्रा.विश्वनाथ सुतार, प्रा.ए.यू.पाटील तसेच एन.एस.एस चे सर्व सदस्य, विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.  

             

फोटो कॅप्शन : राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्य पुरस्कार विजेते प्रा. एन. व्ही. शिंदे,  प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड सोबत कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. सुभाष कांबळे, प्रा. अण्णा पाटील
















Friday, September 23, 2022

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात क्रीडा साहित्य व माहिती यांचे प्रदर्शन उत्साहात संपन्न (जिमखाना विभाग २९/०८/२०२२)

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात क्रीडा साहित्य व माहिती यांचे प्रदर्शन उत्साहात संपन्न -

  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा साहित्य व माहिती यांचे भव्य प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनाचे प्रमुख उद्घाटक म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे सर होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजण्यासाठी व क्रीडा क्षेत्रातून आपले व्यक्तिमत्व कसे तयार होते. यासाठी अशा प्रदर्शनाची गरज आहे. कोणतेही अपयश आले तरी सकारात्मक विचारातून पुढे जाता येते. तसेच कोणत्याही खेळाची माहिती व त्या खेळाच्या साहित्याची माहिती खेळाडूंना असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण खेळामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध आहेत. या संधीची माहिती विद्यार्थ्यांना असली पाहिजे खेळामुळे केवळ शरीरच निरोगी राहते असे नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. येणाऱ्या काळात विविध दर्जाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये चमकायचे असेल तर खेळाची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयात क्रीडा संबंधीत प्रदर्शनाचे आयोजन भविष्यातही केले पाहिजे. आज या क्रीडा दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो!

          या क्रीडा प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, खेळ हा प्रत्येक महाविद्यालयाचा महत्वाचा कणा आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण खऱ्या अर्थाने विविध प्रकारच्या मैदानी खेळामुळेच होते. मन, मनगट व मेंदू बळकट होण्यासाठी खेळाची गरज आहे. त्याचबरोबर क्रीडा प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळ विषयक सर्व बाबींचे आकलन करून देणे सोपे जाते. या प्रदर्शनास मी खूप खूप शुभेच्छा देतो!

          महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कराड शहरातील संत तुकाराम हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, कमला नेहरू अध्यापक महाविद्यालय, पालकर हायस्कूल, आदर्श विद्यामंदिर विंग तसेच आनंदराव पाटील हायस्कूल मलकापूर या महाविद्यालय व शाळांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. अशोक खोत, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत ,सीनियर व ज्युनिअर विभागाचा सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन सीनियर विभागाचे जिमखाना प्रमुख प्रा. देवदत्त महात्मे व प्रा. गौरव पाटील शिक्षकेतर कर्मचारी श्री. पंकज कुंभार यांनी केले.




Thursday, September 22, 2022

समर्पणाच्या भावनेने काम करा यश नक्कीच मिळेल. - प्रा.डॉ. विनायक पवार (मराठी विभाग २०-०९-२०२२)

समर्पणाच्या भावनेने काम करा यश नक्कीच मिळेल. - प्रा.डॉ. विनायक पवार 

कराड (प्रतिनिधी): 

            आयुष्यात संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. अनंत अडीअडचणींना सामोरे जावे लागते. झगडावे लागते. परंतु कामाप्रती समर्पणाची भावना असेल तर उशिरा का होईना यश नक्कीच मिळते. तेव्हा विवेकानंद शिक्षण संस्थेत काम करताना बापूजींना अभिप्रेत असणाऱ्या समर्पणाच्या भावनेने काम करा. यश नक्कीच मिळेल असे आवाहन सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार व कवी प्रा.डॉ. विनायक पवार यांनी केले.                                                                    

            शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्र. प्राचार्य डॉ.महेश गायकवाड तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ उज्वला पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.                              डॉ. पवार पुढे म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आनंदी राहिले पाहिजे. यासाठी वाचनाबरोबर विद्यार्थ्यांनी लेखन केले पाहिजे. अभिव्यक्त झाले पाहिजे.                                              

            अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, एका तांड्यावरून आलेला माणूस साहित्यिक, चित्रपट गीतकार होतो. अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवतो, तरीही विनम्र राहतो. हा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी देखील काव्य निर्मितीचा व लेखनाचा प्रयत्न केला पाहिजे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विविध कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व सुचकपणे मार्गदर्शन करण्याचे काम केले. विद्यार्थ्यांनीही या कवितांना मनमोकळेपणाने उस्फूर्त दाद दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. उज्वला पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दयानंद कराळे यांनी तर आभार प्रा सुरेश रजपूत यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.                      

फोटो कॅप्शन : 

    लेखक आपल्या भेटीला या मराठी विभागाच्या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विनायक पवार सोबत प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ उज्वला पाटील.

















Tuesday, September 20, 2022

निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. - डॉ. महेश गायकवाड (ओझोन दिन १६-०९-२०२२)

निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. - डॉ. महेश गायकवाड 

कराड (प्रतिनिधी) : विकासाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज मनुष्य निसर्गात अतिरेकी हस्तक्षेप करत आहे. एका बाजूला मनुष्याचा विकास होत असला तरी दुसऱ्या बाजूला हळूहळू निसर्गाचे अध:पतन होत आहे, हे देखील तितकेच खरे आहे. तेव्हा प्रत्येक जनमाणसाने यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तरच पर्यावरणीय समतोल राखला जाईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी केले.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे भूगोल विभागाच्या वतीने आयोजित ओझोन संरक्षण या विषयावरील भित्तीपत्रिकेचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुभाष कांबळे, प्रा. सचिन बोलाईकर आदी प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दैनंदिन दिनक्रमाच्या प्रत्येक टप्प्यात माणसाकडून विघातक वायूंचे उत्सर्जन होत आहे. त्याचा परिणाम ओझोन थरावर होत आहे. यामुळेच हिमनग वितळण्याची प्रक्रिया चालू आहे. दिवसेंदिवस समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे हे असेच होत राहिले तर भविष्यातील जीवसृष्टी धोक्यात येईल. तेव्हा पर्यावरणाप्रती अधिक सजग होण्याची आवश्यकता आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

मनोगत व्यक्त करताना प्रा. शोभा लोहार म्हणाल्या, युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीने 19 डिसेंबर 1994 रोजी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. ओझोन थर सूर्यापासून निघणाऱ्या हानीकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो. अल्फाज भालदार, इजाज सवार, विलास साळुंखे या विद्यार्थ्यांनी सदर भित्तिपत्रिकेसाठी संकलन व लेखन केले. कार्यक्रमास प्रा. ए. जी. खोत, प्रा. सुरेश काकडे, प्रा. डॉ. प्रवीण साळुंखे प्रा. महेश लोहार तसेच बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.














भारतातील समाजमन बांधणीचे काम हिंदी भाषा करते - डॉ. भरत सगरे

भारतातील समाजमन बांधणीचे काम हिंदी भाषा करते 
- डॉ. भरत सगरे

कराड (प्रतिनिधी) : भाषावार प्रांतरचनेच्या खंडप्राय भारत देशात 1822 मातृभाषा तर 524 प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. आज अखेर समाजाला बळकटी देण्याचे काम या भाषांनी चोखपणे बजावले आहे. प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे माधुर्य आहे, सौंदर्य आहे. प्रत्येक भाषा श्रेष्ठ आहे. असे असले तरी या सर्व भाषांना स्वातंत्र्य संग्रामात एकत्र बांधण्याचे काम हिंदी भाषेने केले आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन हिंदी साहित्याचे अभ्यासक व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. भरत सगरे यांनी केले.

शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते.

डॉ. सगरे पुढे म्हणाले, भाषा विचारांची अभिव्यक्ती आहे, मनातील विचार प्रभावी मांडण्यासाठी शिक्षण देखील मातृभाषेतून घेतले पाहिजे. परंतु दुर्दैवाने आज बाहेर संस्कृती व भाषांचा पगडा येथील जनमानसावर पडत आहे. परकीय भाषांच्या प्रेमापोटी आपल्या काही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले डॉ. महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात सकारात्मक बदल दिसून येत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, हिंदी ही अध्यात्म, काव्य, प्रेम व संगीताची भाषा आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा योग्य तो सन्मान राखूया. तसेच केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये हिंदी अपेक्षित असते. तेव्हा हिंदी भाषेतून बोलूया.

याप्रसंगी सरल हिंदी कक्षा पाठ्यक्रम यशस्वी पूर्ण केलेल्या प्रा. कु. शितल सालवाडगी कु. मोमीन सोफिया,  कु. अश्विनी सावंत, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. सचिन बोलाईकर, अथर्व सुतार,  मुमताज बेग, सफिना सय्यद, ऐश्वर्या पाटणकर आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रा. रत्नाकर कोळी प्रा. सुभाष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. ए. यू. पाटील तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड प्रा. सविता येवले यांनी केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी आभार मानले.