Tuesday, October 18, 2022

छंदाला योग्य वळण दिले तर नक्कीच आयुष्य घडेल - सिनेअभिनेते सुजित शेख (सांस्क्रुतिक विभाग)

छंदाला योग्य वळण दिले तर नक्कीच आयुष्य घडेल 

         सिनेअभिनेते सुजित शेख               

कराड /प्रतिनिधी : 

            आयुष्यात प्रत्येकाने एखादा छंद जोपासला पाहिजे. याच तुमच्या छंदाला योग्य वळण दिले तर निश्चितच तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळू शकेल. आयुष्यभराच्या चरितार्था सोबतच सामाजिक प्रतिष्ठा व समाधानाची अनुभूती हा छंद तुम्हाला मिळवून देईल. त्यामुळे तुमच्याकडे असणारे कला कौशल्य ओळखा आणि महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करा असे प्रतिपादन झी गौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मा. सुजित शेख यांनी केले.    

            बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड होते. प्रमुख उपस्थितीत शाहीर भानुदास गायकवाड, ढोलकीपटू शुभम दाखले आणि गायिका सृष्टी पाटील आदी होते.                         

            मा. सुजित शेख पुढे म्हणाले, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील गुरुजनांच्या परिसस्पर्शामुळे आम्ही घडलो हे सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. तुम्हीही निश्चितच घडाल यासाठी फक्त महाविद्यालयीन जीवनात जबाबदारीने वागण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि गुरु शोधण्याची गरज आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.                                      

            कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे.  अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने प्रोत्साहन दिले आहे. हीच सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी महाविद्यालये कार्यप्रवण असतात. प्रत्येक महाविद्यालयात कलाकार आणि कलाप्रकार वर्धिष्णू व्हावेत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. याला विद्यार्थ्यांनी देखील तितकीच साद देणे गरजेचे आहे.                                        

            सदर प्रसंगी पाहुण्यांनी विविध समाज प्रबोधनपर गीते, स्फूर्ती गीते, चित्रपट गीते, गझल, कविता सादर करून वातावरण चैतन्याने भारून टाकले होते. संपूर्ण सभागृह रोमांचित झाले होते. महाविद्यालयाचा गुणी कलाकार शुभम काकडे याने देखील तबलावादनाने सर्वांची मने जिंकली. यथोचित अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशा उस्फूर्त भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुभाष कांबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सुरेश यादव यांनी करून दिला. सूत्रसंचालन  प्रा. कु. टी. एम. आत्तार तर आभार प्रा. संभाजी पाटील यांनी मानले. 

फोटो कॅप्शन : 

    सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. सुजित शेख सोबत प्र. प्राचार्य डॉ. महेश गायकवाड























1 comment:

Thanks for reply