मोबाईलमुळे जग जवळ येतंय पण लेकरं मात्र आई-बापापासून दुरावत आहेत. - इंद्रजीत देशमुख
कराड/प्रतिनिधी:
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक थोर विभूतींनी मोठं मोठी स्वप्न पाहिली. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविले, पण अलीकडच्या ७५ वर्षात आमची स्वप्न मात्र खुजी झाली. आत्मकेंद्री राहिली. मी आणि माझे कुटुंब बस एवढेच! त्यात संस्कारांचे पतन आणि समाजभान देखील आम्ही हरपत चाललो आहोत. तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आलं पण लेकरू मात्र आई-बापापासून खूप दूर चाललं आहे. भावनाशून्य शिक्षण हे शिक्षणाचे ध्येय कधीच नव्हते पण आमचा तरुण या भावभावनांपासून देखील दूर चालला आहे. कुटुंबव्यवस्था देखील हा मोबाईल मोडकळीस आणतो की काय, अशी भीती आता ज्येष्ठांना सतावू लागली आहे. तेव्हा पोरांनो माघारी फिरा असे भावनिक आवाहन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे होते. तर प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड होते.
इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले, सुरुवातीच्या काळातले शिक्षण हे जीवनशिक्षण होते. ६४ कला शिकविणारे होते. खरंतर आईच्या शब्दातूनच मूल्य संस्काराला सुरुवात होत होती. पण आम्ही मात्र आता पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षणाचे अवमूल्यन केले. इतरांबद्दल प्रेम आणि इतरांच्या दुःखाने डोळ्यात पाणी येणं आता संपत चाललं आहे. फक्त माहिती म्हणजे शिक्षण नव्हे तर शहाणपण, चेतनेचा विकास हेच खरं शिक्षण आहे. तरुणांचे भावनिक विश्व कस सुदृढ करता येईल यावर तज्ञांना देखील आता काम करावं लागत आहे. हे मोठं दुर्दैव आहे. भारतातील तरुणांचे मोबाईल रोज सरासरी १३ ते १४ तास चालू असतात. सरासरी झोप तीन तासांवर येऊन थांबली आहे. जंगली रमी रोज २० ते २५ आत्महत्या घडवून आणत आहे. सेल्फी दररोज ३० ते ३५ आत्महत्या करायला लावत आहे. नेटफ्लिक्सला तरुणांची झोप संपवायची आहे. तरुणांच्या डोक्यात हिंसा घालायची आहे. व्हाट्सअॅप, फेसबुक विद्यापीठाने तर आमची पोरं संपवली आहेत. दुसऱ्या बाजूला पालकांनी देखील घरात येणारा पैसा पारदर्शक आणायला हवा तरच तेथे मूल्यांची उंची वाढलेली असेल. तेव्हा समाजभान असणाऱ्या व्यक्ती आपण घडवूया. तरच जग वाचेल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे म्हणाले, सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा ही पंचसूत्री सर्वांनी आचरणात आणली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाचे मूल्य हे संस्कारावर ठरत असते. संस्कारपूर्ण आणि समाजाबद्दल आपलेपणाची भावना असणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने समाजाला विधायक दिशा देऊ शकते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणातून संस्कार विद्यार्थ्यांमध्ये बिंबविला पाहिजे. विद्यार्थ्यांना समाजशील बनवणे ही खरी शिक्षकांची कसोटी असून त्याबाबत शिक्षकांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड म्हणाले, अशा विधायक उपक्रमातून आम्हाला बापूजींचे संस्मरण अधिक प्रकर्षाने होते व त्यातून कार्यप्रवण होण्यासाठी अधिकची ऊर्जा मिळते. बापूजींचे विचार जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू आणि बापूजींच्या विचारांजवळ जाण्याचे आत्मिक समाधान मिळवू असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शोभा लोहार यांनी तर आभार प्रा.सुरेश रजपूत यांनी मानले. व्याख्यानास शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. व्याख्यानमालेस संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन प्राचार्य एन.जी.गायकवाड, प्राचार्य एस.के.कुंभार, प्राचार्य आर.के.भोसले तसेच सातारा जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य अरुण कुंभार, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील, माजी प्राचार्य डॉ.सुभाष शेळके तसेच संस्थेतील आजी-माजी पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने हजर राहून कार्यक्रम यशस्वी केला.